अकाऊंट हॅक झालं तर गप्प का बसलात? सुदेश म्हशीलकरांना प्राची पिसाटचा सवाल

ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी फेसबुकवर फ्लर्टिंगचे मेसेज केल्याचा आरोप अभिनेत्री प्राची पिसाटने केला होता. त्यानंतर सुदेश यांनी फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलंय. या स्पष्टीकरणानंतर आता प्राचीने त्यांना प्रतिप्रश्न केले आहेत.

अकाऊंट हॅक झालं तर गप्प का बसलात? सुदेश म्हशीलकरांना प्राची पिसाटचा सवाल
Sudesh Mhashilkar and Prachi Pisat
Image Credit source: Instagram
| Updated on: May 30, 2025 | 4:01 PM

अभिनेत्री प्राची पिसाट आणि सुदेश म्हशीलकर यांच्यातील शाब्दिक वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. फेसबुकवर फ्लर्टिंगचे आणि अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप प्राचीने केल्यानंतर पाच दिवसांनी सुदेश यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यात त्यांनी फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली आहे. आता सुदेश यांच्या स्पष्टीकरणावरून प्राचीने काही प्रतिप्रश्न उपस्थित केले आहेत. अकाऊंट हॅक झालं होतं तर तेव्हाच का पोस्ट लिहिली नाही किंवा मेसेज केला नाही, असा सवाल तिने केला आहे. सुदेश यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यात त्यांच्याकडे प्राचीचा नंबर नाही, असा उल्लेख केला आहे. तर पोस्टमध्ये माझ्याकडे आधीपासूनच तिचा नंबर होता, मग मी कशाला मागेन.. असं म्हटलंय. या गोष्टीवरूनही प्राचीने सुदेश यांना कोंडीत पकडलंय.

प्राची पिसाटचा सवाल-

‘नक्की माझा नंबर सेव्ह होता का नव्हता? फेसबुक अकाऊंटचा ॲक्सेस होता, अकाऊंट हॅक झाल्यानंतरही गप्प का बसलात? अकाऊंट हॅक झाल्याचं फेसबुक फीडवर लगेच किंवा पाच दिवसांनी पोस्ट का नाही केलं? चॅटमध्येच मेसेजच्या खाली लगेच मेसेज का नाही केला, अकाऊंट हॅक झालाय असा. 2017 मध्ये मी तीन महिने फक्त त्या मालिकेत काम केलं होतं. त्यानंतर तुम्हाला कधी भेटले नाही, कधी पाहिला नाही किंवा कधी बोलले नाही. ओळख असणं, माहिती असणं, मैत्री असणं या वेगळ्या गोष्टी आहेत.’

‘राहिला प्रश्न स्माइली इमोजींचा तर 50-60 वर्षांच्या माणसाचा थेट अपमान करण्याऐवजी वयाबद्दल असलेल्या नम्रतेपोटी प्रत्येक मुलगी पहिल्यांदा स्माइल करून हसण्यावारी दुर्लक्ष करते आणि आदरपूर्वक विषय संपवते. दुसऱ्यांदा ठामपणे दुर्लक्ष करते. मी सुद्धा तेच केलं. तरीही मेसेज नाही थांबले. तर तिसऱ्यांदा एकदाच उत्तर देते आणि विषय संपवते. मीसुद्धा तेच केलं.’

‘वयाने मोठे आहेत म्हणून हसण्यावारी नेलं तरी मुलगीच चुकीची.. ठामपणे दुर्लक्ष केलं तरी मुलगीच चुकीची आणि तरीही मेसेज येणं थांबलं नाही म्हणून पोस्ट करून रिप्लाय दिला तरीही मुलगीच चुकीची. मुलींनी नक्की बोलायचं कधी आणि करावं तरी काय? पुरुष कधी आरोप किंवा स्वत:ची जबाबदारी घ्यायला सुरू करणार,’ असा सवाल तिने केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये, कसली गोड दिसतेयस’, असे मेसेज सुदेश यांनी केल्याचा स्क्रीनशॉट प्राचीने शेअर केला होता. प्राचीला तिच्या फेसबुक मेसेंजरमध्ये 7 एप्रिल रोजी सुदेश यांचा आणखी एक मेसेज आला होता. त्याचाही स्क्रीनशॉट तिने शेअर केला होता. त्यात सुदेश यांनी म्हटलं होतं, ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली, वाह!’ प्राचीने हे स्क्रीनशॉट शेअर करत सुदेश यांच्याकडे जाहीर माफीची मागणी केली होती.