उज्ज्वल निकम यांच्या जीवनावरील चित्रपट या तारखेला रिलीज होणार, बडा अभिनेता प्रमुख भूमिकेत
Prahar The Ujjwal Nikam Story : जेष्ठ वकील आणि खासदार उज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जेष्ठ वकील आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार उज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी हा सिनेमा 7 ऑगस्टला रिलीज होणार आहे. उज्वल निकम यांच्या भूमिकेत अभिनेता राजकुमार राव दिसणार आहे. 26/11 खटल्याची ट्रायल ते अनेक संवेदनशील आणि महत्वाच्या प्रकरणाचा संदर्भ या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ऑगस्टमध्ये होणार प्रदर्शित
ट्रेड अॅनालिस्ट तरूण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, निर्माता दिनेश विजन आणि राजकुमार राव पुन्हा एकदा एकत्र काम करत असून हा चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चित्रपटाबाबत चर्चा रंगू लागली आहे. राजकुमार राव आणि दिनेश विजन यांनी यापूर्वीही अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून आता ते नव्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत.
दमदार स्टारकास्टची साथ
या चित्रपटात राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत वामिका गब्बी, सिकंदर खेर आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरूण करत असून वेगळ्या धाटणीच्या कथा सादर करण्यासाठी ते ओळखले जातात.
भूमिकेसाठी विशेष मेहनत
प्रसिद्ध सरकारी वकील उज्जवल निकम यांची भूमिका साकारण्यासाठी राजकुमार राव यांनी विशेष मेहनत घेतल्याचे सांगितले जात आहे. या भूमिकेसाठी त्यांनी वजन वाढवले असून पात्राशी अधिक साम्य साधण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रोस्थेटिक मेकअपचा वापर न करता स्वतःच्या लूकमध्ये बदल करून हे पात्र साकारण्याचा मार्ग निवडला आहे.
बायोपिकप्रेमींची उत्सुकता
गेल्या काही वर्षांत बायोपिकला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आता राजकुमार राव उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.