
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस मराठी 6’ सध्या चांगलाच गाजतोय. नुकतंच या शोमध्ये तीन वाइल्ड कार्ड एन्ट्री झाल्या, संकेत पाठक, रेवा कौरासे आणि संस्कृती साळुंके या तिघांनी वाइल्ड कार्ड एन्ट्री केली. अशातच गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एक धक्कादायक एविक्शन पाहायला मिळालं. प्रसिद्ध स्पर्धक रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं लागलं होतं. त्यानंतर आता या आठवड्यात आणखी एक धक्कादायक एविक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळालं. बिग बॉसच्या नवव्या आठवड्यात गायिका प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात प्राजक्ताचा गेम फारसा दिसत नव्हता. यावरून रितेश देशमुखनेही तिला समजावलं होतं. तर राकेश बापटने वारंवार प्राजक्ता शुक्रेला नॉमिनेट करत तिला तिचा गेम सुधारण्याचा सल्ला दिला होता.
बिग बॉसच्या घरात प्राजक्ता शुक्रेचा सुमधूर आवाज ऐकू यायचा. आपल्या गायनाने ती सर्वांनाच मंत्रमुग्ध करायची. करण सोनावणे घरातून बाहेर पडल्यापासून प्राजक्ताचा गेम कमकुवत झाला होता. प्रेक्षकांनाही ही गोष्ट जाणवू लागली होती. याच गोष्टीचा फटका आता प्राजक्ताला बसला आहे. तिच्या एविक्शनमुळे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. विशेषत: सागर कारंडे खूप भावूक झाला होता. बिग बॉसचं घर आणि भांडणं हे जणू समीकरणच बनलं आहे. त्यामुळे या घरात भांडणं न करता स्वत:चं अस्तित्व टिकवणं तसं अवघडच आहे. प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरात फारशी कोणाशी भांडत नव्हती. तिच्या या स्वभावामुळेच तन्वी कोलते हिनं तिला आयुर्वेदिक असं नाव दिलं होतं.
प्राजक्ताच्या एलिमिनेशननंतर गायक अभिजीत सावंतने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्राजक्ता, तुझा अभिमान आहे’, असं त्याने लिहिलं आहे. ‘बिग बॉसचं घर हे दुर्दैवाने गोड आणि प्रामाणिक माणसांसाठी नाहीये. एक ना दिवस हे होणारच होतं’, अशी प्रतिक्रिया प्राजक्ताच्या चाहत्यांनी दिली. ‘चांगले चांगले लोक बाहेर काढले’, असं आणखी एका युजरने लिहिलं आहे.