पाच वर्षीय मुलाच्या निधनानंतर बदललं ‘सिंघम’मधल्या ‘जयकांत शिक्रे’चं आयुष्य; पतंग उडवताना गेला जीव

| Updated on: Mar 29, 2024 | 3:02 PM

प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1994 मध्ये त्यांनी ललिता यांच्याशी लग्न केलं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.

पाच वर्षीय मुलाच्या निधनानंतर बदललं सिंघममधल्या जयकांत शिक्रेचं आयुष्य; पतंग उडवताना गेला जीव
प्रकाश राज
Image Credit source: Instagram
Follow us on

फोटोत दिसणारा हा अभिनेता एकेकाळी महिन्याला फक्त 300 रुपये कमवायचा. तोच आता केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर कन्नड, तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीत सुपरस्टार आहे. सलमान खान आणि अजय देवगण यांच्या चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका साकारली आहे. आजवरच्या करिअरमध्ये या अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. मात्र खासगी आयुष्यात त्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला. फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे कोणत्याही गॉडफादरशिवाय स्वत:ची छाप सोडण्यात यशस्वी ठरलेत. मेहनत आणि दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांनी स्टारडम मिळवला आहे. हा अभिनेतासुद्धा त्यापैकीच एक आहे. मूळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील हा अभिनेता बॉलिवूडमध्येही लोकप्रिय आहे.

करिअरच्या सुरुवातीला कमावले महिन्याला फक्त 300 रुपये

ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही बोलतोय, त्याचं नाव आहे प्रकाश राज. करिअरच्या सुरुवातीच्या प्रकाश राज यांनी अनेक स्टेज शोज केले आणि यातून ते महिन्याला फक्त 300 रुपये कमवायचे. पण खास त्यांचं अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करायचे. प्रकाश राज यांनी अभिनेत्री ललिता कुमारी यांच्याशी लग्न केलं होतं. 1994 मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले होते. त्यांना मेघना आणि पूजा या दोन मुली आहेत. तर सिद्धू हा मुलगा आहे. मात्र मुलाच्या जन्माच्या पाच वर्षांनंतर प्रकाश राज यांच्या आयुष्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. एकेदिवशी पतंग उडवताना खाली पडल्याने त्यांच्या मुलाचं निधन झालं होतं.

हे सुद्धा वाचा

मुलाविषयी व्यक्त झाले प्रकाश राज

एका मुलाखतीत मुलाबद्दल बोलताना ते म्हणाले, “मी त्याला कधीच विसरू शकत नाही. मी त्याचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. पण तरीसुद्धा मी त्याला विसरू शकत नाही. मी नास्तिक आहे. माझ्या शेतात मला त्याच्या पार्थिवाला दफन करायचं होतं. मी अनेकदा तिथे जाऊन फक्त बसतो. मी किती असहाय्य आहे आणि आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं याची मला त्याने जाणीव करून दिली. माझं माझ्या मुलींवर खूप प्रेम आहे, पण मला मुलाचीही खूप आठवण येते. त्यावेळी तो फक्त पाच वर्षांचा होता. एक फुटाच्या टेबलावरून पतंग उडवताना तो पडला होता.”

कोरिओग्राफरशी दुसरं लग्न

मुलाच्या निधनानंतर ते इतके खचले होते की त्यांनी आत्महत्येचाही विचार केला होता. सिद्धूच्या निधनानंतर प्रकाश राज आणि त्यांची पत्नी ललिता कुमारी यांच्यात वाद होऊ लागले होते. बरेच प्रयत्न करूनही ते आपलं नातं वाचवू शकले नाही. अखेर 2009 मध्ये त्यांनी पत्नीला घटस्फोट दिला. घटस्फोटाच्या एक वर्षानंतर 2010 मध्ये प्रकाश राज यांनी कोरिओग्राफर पोनी वर्माशी दुसरं लग्न केलं. या दोघांना वेदांत हा मुलगा आहे. या दुसऱ्या लग्नाविषयी बोलताना ते म्हणाले, “मी वयाच्या 45 व्या वर्षी तिच्याशी लग्न केलं. तिच्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आला आहे. माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असूनही ती खूप समजुतदार आहे.”