
‘इंडियन आयडॉल 3’चा विजेता, प्रसिद्ध गायक आणि अभिनेता प्रशांत तमांगचं रविवारी दिल्लीत निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्याचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी सकाळी दिल्लीतल्या राहत्या घरात प्रशांत बेशुद्धावस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला तातडीने नवी दिल्लीतल्या द्वारका रुग्णालयात दाखल केलं असता सकाळी 9 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. अरुणाचल प्रदेशमध्ये लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर तो दिल्लीला परतला होता. प्रशांतच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला भेट दिली, तेव्हा त्याची शेवटची पाहून नेटकरी भावूक झाले. डिसेंबर 2025 मधली दुबईतल्या परफॉर्मन्सची ही त्याची शेवटची पोस्ट होती. या व्हिडीओमध्ये प्रशांत दुबईतील चाहत्यांसमोर लाइव्ह परफॉर्म करताना दिसत आहे.
प्रशांत त्याच्या चाहत्यांसमोर हसताना, गाताना आणि कृतज्ञतेने मान झुकवताना दिसत आहे. प्रशांतचा जन्म दार्जिलिंगमध्ये झाला असून 2007 मध्ये ‘इंडियन आयडॉल’चं तिसरं सिझन जिंकल्यानंतर तो देशभरात लोकप्रिय झाला. ईशान्य भारतातून विजेतेपद जिंकणारा तो पहिला स्पर्धक ठरला होता. गायनासोबतच प्रशांतने अभिनय क्षेत्रातही काम केलंय. ‘पाताल लोक’ या वेब सीरिजमध्येही त्याने भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने अनेक नेपाळी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
प्रशांतच्या निधनाचं नेमकं कारण त्याच्या शवविच्छेदन अहवालातूनच स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रशांत दिल्ली इथल्या घरात पत्नी आणि मुलीसोबत राहत होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. प्रशांतला यापूर्वी कोणत्याही गंभीर आरोग्याच्या समस्यांची लक्षणं दिसली नव्हती. त्यामुळे अचानक आणि अनपेक्षिकपणे आलेल्या कार्डिअॅक अरेस्टने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रशांतचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळ गावी दार्जिलिंग इथं नेलं जाईल की दिल्लीतच अंत्यसंस्कार पार पडतील, याबद्दल सध्या त्याच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे.
‘इंडियन आयडॉल 3’पासून तमांगचा अगदी जवळचा मित्र राहिलेला गायक अमित पॉलने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हे कसं शक्य आहे? तुझ्याशिवाय जग पूर्वीसारखं राहणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही. मला तुझ्याविषयी ही पोस्ट लिहावी लागतेय, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. माझा भाऊ, माझा मित्र प्रशांत तमांग.. तुझ्या आत्म्याला शांती मिळो’, असं त्याने लिहिलंय.