
2024 मध्ये मराठी, हिंदी आणि साउथमधील अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. आता 2025 सुरु होताच पुन्हा एकदा लग्नाचा सीझन सुरु झाला आहे असं म्हणावं लागेल कारण बी-टाऊनमधील अजून एक जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी एक खास दिवसही निवडला आहे. येत्या 14 फेब्रुवारीलाही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.
बी-टाऊनमधील जोडी अडकणार लग्नबंधनात
तर ही बी-टाऊनमधील जोडी आहे प्रतीक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी. स्मिता पाटील व राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर हा मॉडेल प्रिया बॅनर्जीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यांच्या नात्याला आता दोन ते तीन वर्षे झाली आहेत. हे दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. या दोघांनी गेल्या वर्षी त्यांचे नाते अधिकृत केले होते.आता दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
प्रतीक बब्बरचं हे दुसरं लग्न
प्रतीक बब्बरचं हे दुसरं लग्न आहे. त्याने पहिलं लग्न सान्या सागरशी 2019 मध्ये केलं होतं मात्र फार काळ टिकलं नाही त्यांनी 2023 मध्ये घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर प्रतीकच्या आयुष्यात प्रिया आली आणि यांच्यासाठी नवीन सुरुवात झाली.
एका रिपोर्टनुसार प्रतीकने प्रियाला लग्नाबद्दल खूप आधीच विचारलं होतं मात्र यावर तिने 26 नोव्हेंबर 2023 रोजी होकार दिल्याचं म्हटलं जातं. तिच्या वाढदिवसाच्या फक्त दोन दिवस आधी तिने लग्नास होकार दिल्याचं त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितलं. एवढच नाही तर प्रतीकने गुडघ्यावर बसून प्रियाला प्रपोज केलं होतं. सगळेच जण त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहतोय असही त्यांच्या या मित्राने म्हटलं होतं.
लग्नासाठी निवडला खास दिवस
प्रतीक आणि प्रियाने त्यांच्या लग्नासाठी वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस निवडला आहे. हे जोडपं व्हॅलेंटाईन डेला लग्न करणार आहे. 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रतीक आणि प्रिया सात फेरे घेऊन लग्नबंधनात अडकतील.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, हे जोडपं प्रतिकच्या वांद्रे येथील घरी लग्न करणार आहेत. ज्यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत हे जोडपं लग्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या जोडप्याने अद्याप त्यांच्या लग्नाची बातमी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
कोण आहे प्रिया बॅनर्जी?
प्रिया बॅनर्जी एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2013 मध्ये साऊथ चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. प्रसिद्ध अभिनेता आदिवी शेषसोबत ती तेलुगू चित्रपट ‘किस’मध्ये दिसली होती. यानंतर त्याने संदीप किशन आणि राशि खन्ना यांसारख्या कलाकारांसोबत स्क्रीनही शेअर केली. काही वर्षे तेलुगू सिनेमांमध्ये काम केल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2015 मध्ये ती ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘जज्बा’ चित्रपटात दिसली होती.
प्रतीक आणि प्रियाची भेट कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध अभिनेता राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नोव्हेंबर 2023 मध्ये प्रिया बॅनर्जीला तिच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी प्रपोज केले होते. दरम्यान प्रियाबद्दल प्रतिक नेहमीच भरभरून बोलतो.
तो एका मुलाखतीत म्हणाला होता की, “मी खूप भाग्यवान आहे की प्रिया माझ्या आयुष्यात आली. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, पण माझ्या आयुष्यात अशी अद्भुत स्त्री आली, यासाठी मी आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगलं काम केलं असेल. माझा घटस्फोट झाला आणि प्रियानेही तिचा साखरपुडा मोडला होता. त्याच काळात 2020 मध्ये मेसेजवर आमचं बोलणं सुरू झालं. माझ्या घटस्फोटामुळे मी सुरुवातीला संकोच करत होतो पण आता मात्र तिच माझं घर आहे. मला तिचं वेड लागलं आहे,” असं म्हणत त्यानं तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. दरम्यान ही जोडी आता कधी यांच्या लग्नाची अधिकृतपणे घोषणा करतायत याकडे सर्वांच लक्ष आहे.