‘प्रिन्स ऑफ मुळशी’ विशाल फालेच्या नव्या व्हिडिओला युट्यूबवर दमदार प्रतिसाद

विशाल याआधीही म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेसोबत त्याचा ‘जीव रंगलया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. इन्स्टाग्रामवर 'प्रिन्स ऑफ मुळशी' या नावाने प्रसिद्ध असलेल्या विशालचे एक दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

प्रिन्स ऑफ मुळशी विशाल फालेच्या नव्या व्हिडिओला युट्यूबवर दमदार प्रतिसाद
Vishal Phale
Image Credit source: Youtube
| Edited By: | Updated on: Jun 06, 2022 | 7:50 AM

‘चिंब झालं आज उधाण वारं, हवीशी वाटे तू मला’ असे बोल असलेला ‘हवीशी वाटे’ हा नवाकोरा म्युझिक अल्बम सप्तसूर म्युझिकने लाँच केला आहे. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर (Social media influencer) आणि अभिनेता विशाल फाले (Vishal Phale) या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकला आहे. या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. सुशील बनसोडे प्रॉडक्शनच्या सुशील बनसोडे यांनी ‘हवीशी वाटे’ या म्युझिक अल्बमची निर्मिती केली आहे. तर सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांनी हा म्युझिक अल्बम प्रस्तुत केला आहे. राहुल काळे यांनी लिहिलेलं ‘हवीशी वाटे’ हे गीत विजय भाटे यांनी संगीतबद्ध केलं आहे. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे यांनी हे गाणं गायलं आहे. सचिन कांबळे म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शक आहेत. विशाल फाले आणि शुभांगी गायकवाड (Shuubhangi Gaikwaad) ही जोडी म्युझिक अल्बममध्ये आहे.

विशाल फालेने आतापर्यंत त्याच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी व्हिडिओजच्या माध्यमातून लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हवीशी वाटे या म्युझिक अल्बमद्वारे एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. हळूवार शब्द, मनात सहजच रुंजी घालणारी चाल, केवल वाळंज, सोनाली सोनावणे यांचा श्रवणीय आवाज आणि उत्तम छायांकन हे या म्युझिक व्हिडिओचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे विशालच्या व्हिडिओजप्रमाणेच चाहत्यांकडून ‘हवीशी वाटे’ या म्युझिक व्हिडिओलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

पहा व्हिडीओ-

विशाल याआधीही म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला आहे. अभिनेत्री ऋतुजा बागवेसोबत त्याचा ‘जीव रंगलया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. इन्स्टाग्रामवर ‘प्रिन्स ऑफ मुळशी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या विशालचे एक दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.