प्रियांका चोप्राच्या लेकीचा अज्ञाताकडून पाठलाग अन्..; घटनेनंतर ‘देसी गर्ल’ने घेतला मोठा निर्णय

लेक मालतीसोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग प्रियांका चोप्राने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे. या घटनेनंतर प्रियांका आणि निकने मुलीच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याचं ठरवलं आणि तिची सुरक्षा वाढवली.

प्रियांका चोप्राच्या लेकीचा अज्ञाताकडून पाठलाग अन्..; घटनेनंतर देसी गर्लने घेतला मोठा निर्णय
प्रियांका चोप्रा, निक जोनास, मालती मेरी
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2026 | 12:10 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मुलांना प्रकाशझोतापासून लांब ठेवणं पसंत करतात. अनुष्का-विराट, आलिया-रणबीर, दीपिका-रणवीर यांसारख्या सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांना पापाराझी आणि कॅमेरापासून दूर ठेवलं आहे. तर परदेशात राहणारी ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा याला अपवाद नाही. प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केलं. 2022 मध्ये सरोगसीद्वारे या दोघांना मुलगी झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका तिच्या मुलीच्या सुरक्षेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. प्रियांका आणि निक त्यांच्या मुलीच्या खासगी आयुष्याची आणि सुरक्षेची खूप काळजी घेतात.

‘नॉट स्किनी बट नॉट फॅट’ या पॉडकास्टमध्ये प्रियांकाने नुकतीच हजेरी लावली होती. “मालती जसजशी मोठी होतेय, तसतसं तिला आम्ही प्रकाशझोतापासून दूर ठेवणंच पसंत करतोय. मालतीने सर्वसामान्य मुलांसारखं आयुष्य जगावं, कोणत्याही भीतीशिवाय तिला वावरता यावं, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. लोकांनी परवानगीशिवाय तिचे फोटो किंवा व्हिडीओ काढू नये, असं आम्हाला वाटतं.” यावेळी प्रियांकाने मालतीसोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाचाही खुलासा केला.

एक अनोळखी व्यक्ती शाळेपासून घरापर्यंत मालतीचा पाठलाग करत होत आणि तिचा व्हिडीओ काढत होता, असं प्रियांकाने सांगितलं. या घटनेनंतर मालतीची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यामुळे ती जेव्हा कधी घराबाहेर जाते, तेव्हा तिच्यासोबत सुरक्षारक्षक असतात. “सेलिब्रिटी असल्यामुळे माझं आयुष्य जरी सार्वजनिक असलं तरी माझ्या मुलीला तिच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मिळावा, असं मला वाटतं. मी लोकांच्या उत्सुकतेला समजू शकते, परंतु माझ्यासाठी मालतीची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे”, असं ती पुढे म्हणाली.

प्रियांका चोप्रा वयाच्या 39 व्या वर्षी सरोगसीद्वारे आई झाली. त्यांची मुलगी मालती आता चार वर्षांची झाली आहे. आई डॉ. मधू चोप्रा यांच्या सांगण्यावरून प्रियांकाने वयाच्या तिशीत असतानाच तिचे एग्ज फ्रीज केले होते. प्रियांका आणि निक यांची भेट 2018 मध्ये झाली आणि त्याच वर्षी दोघांनी लग्न केलं. त्यावेळी प्रियांका 36 आणि निक 26 वर्षांचा होता. निकला भेटण्याच्या खूप आधीच मी एग्ज फ्रीज केले होते, असं प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Follow Us