पुष्पा 2 च्या प्रीमिअरदरम्यान मोठी दुर्घटना, थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन महिलेचा मृत्यू

पुष्पा 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसत आहे. ती एवढी प्रचंड आहे की त्यामुळे हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर या दुर्घटनेत आणखी एक व्यक्ती जखमी झाली.

पुष्पा 2 च्या प्रीमिअरदरम्यान मोठी दुर्घटना, थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन महिलेचा मृत्यू
पुष्पा 2 च्या प्रीमिअरदरम्यान दुर्घटना
Image Credit source: social media
| Updated on: Dec 05, 2024 | 9:11 AM

फायनली…. 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर, ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट थिएटरमध्ये आला आहे. अल्लू अर्जुनच्या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसत आहे. या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात अडव्हान्स बूकिंगही झालं असून हा चित्रपचट अनेक रेकॉर्ड्स मोडण्याच्या तयारीत आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी अत्यंत आतूर आहेत. मात्र याच चित्रपटाच्या प्रीमिअर शो दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर यामध्ये आणखी एक व्यक्ती देखील जखमी झाली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणच्या हैदराबादमध्ये हा अपघात झाला. तेथील संध्या थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन महिलेचा मृत्यू झाला. रेवती असे तिचे नाव आहे. तर या घटनेत एक 9 वर्षांचा बालकही जखमी झाला असून तो मृत महिलेचा मुलगा असल्याचे समजते. चित्रपटगृहात प्रेक्षकांची संख्या मर्यादाबाहेर गेल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत आई आणि मुलगा बेशुद्ध झाले. उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाला, तर जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

रिपोर्टनुसार, या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा प्रीमिअर शो होता. मात्र थिएटरमध्ये निर्धापित मर्यादेपेक्षा जास्त लोक पोहोचल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थिएटरमध्ये सुमारे 200 पोलिस तैनात होते. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

आग्रा स्टेशनवरही झाली होती चेंगराचेंगरी

दरम्यान गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील आग्रा स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली होती. टीसी तपासासाठी कोचमध्ये चढले असताना हा अपघात झाला. त्यांना पाहताच चेंगराचेंगरी झाली. काही प्रवाशांनी साखळी ओढली होती. गाडीमध्ये असे बरेच प्रवासी होते जे जनरल तिकीटावर रिझर्व्ह कोचमधून प्रवास करत होते. टीसी येताच एकच पळापळ झाली. मात्र प्रवासी खाली उतरताच टीसी आणि आरपीएफ अधिकाऱ्यांनी त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला.