Pushpa 2 Teaser: पुष्पाराजचा ‘हा’ अंदाज पाहून अंगावर येईल काटा! धमाकेदार टीझर प्रदर्शित

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमधील अल्लू अर्जुनच्या जबरदस्त लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

Pushpa 2 Teaser: पुष्पाराजचा हा अंदाज पाहून अंगावर येईल काटा! धमाकेदार टीझर प्रदर्शित
Pushpa 2 teaser
Image Credit source: Youtube
| Updated on: Dec 26, 2024 | 3:47 PM

“पुष्पा म्हणजे फ्लॉवर समजलात का? फायर आहे मी फायर..” या डायलॉगने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटातील हा डायलॉग होता. बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळवल्यानंतर आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा : द रुल’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला. जवळपास एक मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनचा जबरदस्त अंदाज पहायला मिळतोय. या टीझरने चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढवली आहे.

‘पुष्पा 2’चा हा टीझर पाहिल्यानंतर पहिल्या भागापेक्षा हा दुसरा भाग अधिक पॉवरफुल असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये अल्लू अर्जून काली देवीच्या लूकमध्ये पहायला मिळतोय. ‘गंगम्मा तल्ली’च्या जत्रेमधील अॅक्शन सीन्सची झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. गंगम्मा तल्ली जत्रा ही तिरुपतीमधील प्रचलित प्रथा आहे. दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते. अखेरच्या दिवशी पुरुष महिलांच्या पोशाखात तयार होतात आणि गंगम्माचं रुप धारण करतात. गंगम्मा तल्ली म्हणजेच गंगम्मा आई ही वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी मानली जाते.

पहा टीझर-

सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश प्रताप भंडारी आणि सुनील यांच्या भूमिका आहेत. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारा अल्लू अर्जुन पहिलाच तेलुगू अभिनेता आहे. विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी काहीच फी घेतली नाही. मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी 33 टक्के भाग त्याला मिळणार आहे.

‘पुष्पा : द राईज’मधील गाणीसुद्धा तुफान गाजली होती. श्रीवल्ली, ऊ अंटावा आणि सामी सामी ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. डीएसपी यांनी ‘पुष्पा’तील गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं. आता ‘पुष्पा 2’च्या टीझरमध्येही जबरदस्त बॅकग्राऊंड स्कोअर ऐकायला मिळत आहे.