अत्यंत लज्जास्पद.., वजन कमी करण्याच्या इंजेक्शन कंपनीला आर. माधवनने थेट बजावली नोटीस; नेमकं काय घडलं?
अभिनेता आर. माधवनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित वजन कमी करण्याच्या इंजेक्शनच्या कंपनीला फटकारलं आहे. या कंपनीला त्याने कायदेशीर नोटीससुद्धा बजावली आहे. नेमकं काय घडलंय, ते सविस्तर वाचा..

सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रिटींच्या विविध जाहिराती किंवा ब्रँड प्रमोशन्सचे व्हिडीओ पहायला मिळतात. काही सेलिब्रिटी रिसतर करार करून ठराविक प्रॉडक्ट्ससाठी जाहिराती करतात, तर काही वेळा सेलिब्रिटींचे फोटो किंवा व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. सेलिब्रिटींचं नाव पाहून ग्राहक जाहिरात आणि प्रॉडक्टकडे आकर्षित होतील, असा त्यामागचा विचार असतो. अशाच एका जाहिरातीमध्ये परवानगीशिवाय मुलाखतीची क्लिप वापरल्याप्रकरणी अभिनेता आर. माधवनने संताप व्यक्त केला आहे. माधवनच्या मते कंपनीने कोणत्याही परवानगीशिवाय आणि पूर्वकल्पना न देता त्याच्या व्हिडीओचा एक भाग अशा पद्धतीने प्रचारासाठी वापरला आहे, ज्यावरून लोकांना वाटू शकतं की तो त्या प्रॉडक्टचं समर्थन करत आहे. हे अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणत आर. माधवनने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
बुधवारी माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका वेलनेस ब्रँडच्या व्हिडीओचा स्क्रिनशॉट शेअर केला. या पोस्टमध्ये संबंधित ब्रँडने त्याच्या मुलाखतीची एक क्लिप वापरली होती. फोटोमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की, मुलाखतीचा व्हिडीओ अशा पद्धतीने वापरण्यात आला आहे, ज्यावरून सर्वसामान्यांचा हा गैरसमज होईल की माधवन त्या प्रॉडक्टची प्रशंसा करत आहे किंवा त्याचा प्रचार करत आहे. यावरूनच त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माधवनची पोस्ट-
स्क्रीनशॉट शेअर करत आर. माधवनने त्याची प्रतिक्रिया लिहिली आहे. ‘या व्हिडीओला अशा पद्धतीने बनवलंय, जणू मीच त्या प्रॉडक्टचा प्रचार करतोय. यात माझी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती आणि माझ्या मुलाखतीचा थेट वापर त्यांच्या प्रचारासाठी करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे लोकांचा विश्वास उडून जातो. कोण योग्य आणि कोण चुकीचं हे समजण्यास कठीण होतं. हे अत्यंत लज्जास्पद आहे’, अशा शब्दांत माधवनने आवाज उठवला.
‘ही अत्यंत दु:खद आणि लाजिरवाणी बाब आहे की काही लोक आणि कंपन्यांना असं वाटतं की ते कोणाच्या तरी मुलाखतीचा एक छोटा भाग घेऊन त्याचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करू शकतात. कलाकाराचे शब्द किंवा व्हिडीओ त्यांच्या परवानगीशिवाय प्रसिद्धीसाठी वापरणं चुकीचं आहे. याप्रकरणी कायदेशीर नोटी पाठवण्यात आली आहे’, असं त्याने स्पष्ट केलंय. या पोस्टमध्ये माधवनने लोकांना अशा कंपन्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. माधवच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचा अनुभव सांगितला आहे. संबंधित जाहिरात वजन कमी करण्याच्या इंजेक्शन्ससंदर्भात असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.