“शर्टलेस किंवा कुठेही झोपलेला दिसता कामा नये..”; आर. माधवनने मुलाला ‘या’ गोष्टीची दिली सक्त ताकीद

अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवनने आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावलंय. त्याने स्विमिंगमध्ये पाच वेळा सुवर्णपदक पटकावलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माधवन त्याच्या मुलाला दिल्या जाणाऱ्या शिकवणीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

शर्टलेस किंवा कुठेही झोपलेला दिसता कामा नये..; आर. माधवनने मुलाला या गोष्टीची दिली सक्त ताकीद
R Madhavan and his son
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 30, 2025 | 9:25 AM

आपल्या नावापेक्षा आपल्या कामाने ओळखलं जावं, अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. मात्र बॉलिवूड इंडस्ट्रीत असा एक कलाकार आहे, ज्याला त्याच्या मुलाच्या नावाने ओळखलं जाण्यात सर्वाधिक आनंद होतो. कारण त्याच्याच इतकी दमदार त्याच्या मुलाची कामगिरी आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून आर. माधवन आहे. आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन हा भारतीय फ्री-स्टाइल स्वीमर आहे. वेदांतने मलेशिया ओपन स्पर्धेत आतापर्यंत पाच वेळा सुवर्णपदक पटकावलं आहे. तर डॅनिश ओपन स्पर्धेत त्याने सुवर्ण आणि रौप्यपदक आपल्या नावे केले आहेत. स्विमिंग विश्वात आर. माधवनच्या मुलाने खूप नाव कमावलंय. आपल्या मुलाच्या या कामगिरीबद्दल त्याचा खूप अभिमान वाटत असल्याची भावना आर. माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केली. मात्र असं असलं तरी त्याला सतत त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत असल्याचं त्याने सांगितलं.

‘मिस मालिनी’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत माधवन म्हणाला, “जेव्हा सर्वसामान्य व्यक्ती जवळ येऊन कौतुक करते की आम्हाला तुमचं काम आवडतं, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. पण हे जेव्हा मुलगा वेदांतच्या बाबतीत होतं, तेव्हा अभिमानाने माझी छाती आणखी फुलते. करिअरच्या सुरुवातीलाच वेदांतला खूप प्रसिद्धी मिळतेय याचा आनंद तर आहेच, पण त्याला अजून खूप पुढे जायचं आहे. त्यामुळे मी त्याला या गोष्टीची आठवण करून देत असतो की, दुर्दैवाने किंवा सुदैवाने तू माझा मुलगा असल्याने तुला काही विशेषाधिकार आपसूकच मिळत जाणार आहेत.”

“मी त्याला सांगतो की, तू कुठेही शर्टलेस किंवा कुठल्याही बेडवर झोपलेला दिसू नये. कारण त्या अवस्थेतील त्याचा एक फोटो ही राष्ट्रीय बातमी बनू शकते. ते म्हणतील, दारू पिऊन झोपलाय किंवा आणखी काही.. तू तुझ्या मित्रांसारखा आलिशान किंवा मनमौजी आयुष्य जगू शकत नाही, याची सतत जाणीव मी त्याला करून देत असतो. प्रसिद्धी आणि आदर्श व्यक्तीमत्त्वाचं ओझं त्याला सतत वाहायचंच आहे”, असं माधवन पुढे म्हणाला.

एका मुलाखतीत वेदांतनेही त्याच्या या करिअरसाठी आईवडिलांनी केलेल्या त्यागाचा उल्लेख केला होता. “मला माझ्या बाबांच्या सावलीखाली जगायचं नव्हतं. मला माझं स्वत:चं नाव कमवायचं होतं. फक्त आर. माधवनचा मुलगा म्हणून मला राहायचं नाहीये. त्यांनी माझी नेहमीच काळजी घेतली आहे. आई आणि बाबा दोघंही माझ्यासाठी खूप काही करतात. माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी केलेला सर्वांत मोठा त्याग म्हणजे ते मुंबई सोडून दुबईला राहायला आले”, असं तो म्हणाला होता.