Rahul Vaidya: राहुल वैद्यने बेडरुमच्या प्रायव्हेट गोष्टी सर्वांसमोर सांगितल्या..; पत्नी दिशाही हैराण, भडकले नेटकरी
‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ या शोची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये राहुल वैद्य त्याच्या खासगी आयुष्याबद्दल असं काही म्हणाला आहे, ज्यावरून नेटकरीसुद्धा त्याच्यावर भडकले आहेत.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र, कधी कधी कलाकारांच्या खासगी आयुष्याशी संबंधित वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण होतो. असंच काहीसं गायक आणि ‘बिग बॉस 14’ फेम राहुल वैद्य याच्यासोबत घडलं आहे. सध्या राहुल वैद्य पत्नी आणि अभिनेत्री दिशा परमारसोबत ‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात सहभागी होत आहे. या शोमधील एका व्हायरल क्लिपमुळे राहुलवर सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होत आहे. पत्नीच्या खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिक व्यासपीठावर बोलणं अनेक नेटकऱ्यांना खटकलं आहे.
राहुल वैद्यने नेमकं काय म्हटलं?
‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ या कार्यक्रमात सेलिब्रिटी जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्याशी संबंधित अनेक मजेशीर प्रश्न विचारले जातात. अशाच एका सेगमेंटमध्ये राहुल वैद्यला प्रश्न विचारण्यात आला की, दिशा परमार लग्नाआधी कोणत्या पाच गोष्टी करत होती, ज्या आता करत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना राहुलने थेट शब्दांत न बोलता शारीरिक जवळीक अर्थात पती-पत्नीमधील खासगी संबंधांकडे इशारा करत वक्तव्य केलं. त्याच्या या उत्तरानंतर दिशा परमारही आश्चर्यचकित झाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं. तिने ‘तू वेडा आहेस का?’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्याचवेळी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या अभिनेता अर्जुन बिजलानीनेही राहुलच्या वक्तव्यावर मिश्किल टिप्पणी केली.
या क्लिपनंतर राहुलच्या वक्तव्याचा अर्थ आणि सार्वजनिक कार्यक्रमात खासगी गोष्टी बोलण्याची गरज होती का, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. राहुल वैद्यच्या या वक्तव्यावर अनेक सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. पत्नीच्या खासगी आयुष्याबद्दल नॅशनल टीव्हीवर अशा प्रकारे बोलणं योग्य नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. काही नेटकऱ्यांनी राहुलला ‘चीप’ म्हणत टीका केली, तर काहींनी दिशा परमारचा विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया दिली.
एडिटिंगमुळे गैरसमज झाला का?
या प्रकरणात काही प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. व्हायरल क्लिप एडिट केलेली असू शकते आणि त्यामुळे राहुलच्या वक्तव्याचा संदर्भ बदलला असण्याची शक्यता असल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे संपूर्ण भागातील संवाद आणि त्याचा संदर्भ समजून घेणं महत्त्वाचं ठरतं, असं काहीजण म्हणाले.
राहुल वैद्य ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वातून लोकप्रिय झाला. त्यानंतर ‘बिग बॉस 14’मुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. याच पर्वादरम्यान त्याने दिशा परमारला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. दोघांनी जुलै 2021 मध्ये लग्नगाठ बांधली.