
हिंदी चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्गज दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांची पत्नी आणि अभिनेते कुमार गौरव यांची आई शुक्ला कुमार यांचं निधन झालं आहे. कुमार गौरवने अभिनेता संजय दत्तची सख्खी बहीण नम्रता दत्तशी लग्न केलं होतं. शुक्ला कुमार या कधीच प्रकाशझोतात राहणं पसंत करत नव्हत्या. त्या लाइमलाइटपासून कायम दूर असायच्या. त्यांच्या निधनाने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. येत्या 10 जानेवारी रोजी त्यांच्या कुटुंबीयांकडून शोकसभा आयोजित करण्यात येणार आहे. या शोकसभेत उपस्थित राहून बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. शुक्ला यांच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
शुक्ला कुमार यांचे पती आणि बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते राजेंद्र कुमार यांचं निधन जवळपास 35 वर्षांपूर्वी झालं होतं. 12 जुलै 1991 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी आपले प्राण गमावले होते. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ते कॅन्सरग्रस्त होते, परंतु त्यातून बरं होण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे औषधोउपचार घेण्यास नकार दिला होता, असंही म्हटलं जातं. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला कुमार या नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहत होत्या. परंतु कुटुंबाप्रती त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला बदलताना, प्रगती करताना आणि पुढे जाताना पाहिलंय. राजेंद्र कुमार यांच्या करिअरमधील प्रत्येक चढउतारात त्या त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या होत्या.
राजेंद्र कुमार आणि शुक्ला कुमार, सोबत त्यांची तीन मुलं
शुक्ला कुमार या हिंदी सिनेसृष्टीतील रमेश बहल आणि श्याम बहल यांच्या बहीण होत्या. या नात्याने त्या गोल्डी बहल आणि रवी बहल यांच्या मावशी होत्या. म्हणजेच त्यांचं नातं फक्त एका सुपरस्टारच्या कुटुंबापर्यंत मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेलं होतं. शुक्ला कुमार आणि राजेंद्र कुमार यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. त्यांचा मुलगा कुमार गौरवने अभिनयक्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. कुमार गौरवने अभिनेता संजय दत्तची बहीण नम्रता दत्तशी लग्न केलं होतं. तर मुलगी डिंपलचं लग्न हॉलिवूड चित्रपट निर्माते राजू पटेल यांच्याशी झालं. दुसरी मुलगी मनोरमाने निर्माते ओ. पी. रहलान यांच्याशी लग्नगाठ बांधली.
राजेंद्र कुमार यांच्या पत्नीचं निधन
राजेंद्र कुमार यांना लोक प्रेमाने ‘ज्युबिली कुमार’ असंही म्हणायचे. बॉक्स ऑफिसवर लागोपाठ हिट चित्रपट देण्यासाठी ते प्रसिद्ध होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी पाच वर्षे दिग्दर्शक एच. एस. रवैल यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केल्याचं म्हटलं जातं. या संपूर्ण प्रवासात शुक्ला कुमार त्यांची खूप मोठी ताकद बनल्या होत्या.