सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल

'लॉक अप 2' या शोमधील एका टास्कदरम्यान अभिनेता राम कपूरचा संताप अनावर होतो आणि तो थेट सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागतो. हे पाहून नेटकरी त्याच्यावर चांगलेच चिडले आहेत. सलमान असता तर अशी हिंमत झाली असती का, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

सलमानसमोर अशी हिंमत होईल का? रितेश देशमुखसोबत उद्धटपणे वागणारा अभिनेता ट्रोल
Ram Kapoor and Riteish Deshmukh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2026 | 2:42 PM

‘लॉक अप : सच या सजा’ या बहुचर्चित शोचा दुसरा सिझन नुकताच सुरू झाला आहे. हा सिझन पहिल्या एपिसोडपासून त्यातील वादविवाद, भांडणं आणि ड्रामामुळे चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेता राम कपूर अत्यंत उद्धटपणे वागताना आणि बोलताना दिसला. सूत्रसंचालक रितेश देशमुखसोबत तो चिडून बोलला. यावरून नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सलमान खानसमोर अशी हिंमत केली असती का, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. ‘लॉक अप 2’चं सूत्रसंचालन फराह खान आणि रितेश देशमुख करत आहेत. या शोच्या एका टास्कमध्ये हर्षद चोपडा आणि आकांक्षा चमोला यांच्या हातात पेंटबॉल गन्स होत्या. असुरक्षित स्पर्धकांना या आठवड्यातील एलिमिनेशनमधून वाचण्यासाठी एकही पेंटबॉलची गोळी न लागता बझरपर्यंत पोहोचायचं होतं.

राम कपूर बझरपर्यंत पोहोचण्यात अयशस्वी ठरला आणि त्याने मधेच पाणी मागितलं. जेव्हा त्याला पाणी दिलं गेलं नाही, तेव्हा त्याचा संयम सुटला. तो म्हणाला, “मी खूप वेळापासून पाणी मागतोय. तुम्ही आम्हाला हे सर्व करायला लावत आहात, पण पाणी देत नाही. हे बरोबर नाही. पाणी पाठवा.” टास्क संपेपर्यंत त्याची विनंती पूर्ण न झाल्यामुळे अखेर चिडलेला राम खेळाच्या मैदानात मध्यभागी उभा राहिला आणि त्याने खेळ पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. रामचा आडमुठेपणा पाहून जेव्हा रितेश देशमुख त्याला पेंटबॉल लागू शकतो, असा इशारा देतो, तेव्हा राम त्याला म्हणतो, “लागू दे, या मारा.”

पहा व्हिडीओ

रितेश रामला स्पष्ट करतो की प्रत्येक स्पर्धकाला आधीच एक वैयक्तिक पाण्याची बाटली देण्यात आली आहे आणि टास्कदरम्यान ती बाटली सोबत बाळगणं ही त्या स्पर्धकाची जबाबदारी आहे. हे ऐकल्यानंतर अखेर राम कपूर बाजूला होतो आणि टास्क चालू ठेवण्याची परवानगी देतो. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रामच्या उद्धट वागण्यावर टीका केली आहे.

‘सलमान खानच्या पुढे असं काही करण्याची हिंमत नसेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘तो इतका ओव्हरअॅक्ट का करतोय’, असा सवाल दुसऱ्याने केला. ‘सलमान खानसोबत असं वागणार नाही’, अशीही टिप्पणी नेटकऱ्यांनी केली आहे. रितेश देशमुख आणि फराह खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘लॉक अप 2’मध्ये राम कपूर, धीरज कपूर, हर्षद चोपडा, शिवांगी जोशी, आकांक्षा चमोला, श्रेया कालरा, योगेश रावत, पमला सेरेना, सुनीता अहुजा आणि आकांक्षा चोपडा हे स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Follow Us