
मुंबई | आजपर्यंत अनेक राजयकीय कुटुंबातील मुलींनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर काही अभिनेत्रींना यश मिळालं तर, काही अभिनेत्रींना अपयशाचा सामना करावा लागला. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर. राजेंद्र प्रसाद यांच्या नातीने देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. एवढंच नाही तर राजेंद्र प्रसाद यांच्या नातीने अभिनेता रणबीर कपूर, जिमी शेरगिल यांच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली. ज्या अभिनेत्रीबद्दल सध्या चर्चा सुरु आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्रेया नारायण आहे. श्रेयाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही.
एवढंच नाही तर, सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी देखील अभिनेला मिळाली नाही. पण श्रेयाने सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. श्रेया नारायण फक्त अभिनेत्री नसून प्रसिद्ध लेखीका आणि समाजसेविका देखील आहे. बॉलिवूड प्रमाणेच श्रेयाने छोट्या पडद्यावर देखील भूमिका साकारत चाहत्यांच्या भेटीस आली.
श्रेयाने ‘पाऊडर’ या सोनी टीव्हीवरील मालिकेतून करियरची सुरुवात केली. तर २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘साहब बीवी और गँगस्टर’ सिनेमातून श्रेयाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाचं दिग्दर्शन तिग्मांशू धुलिया यांनी केलं होतं. सिनेमात श्रेयाने ‘महुआ’ या भूमिकेला न्याय दिला. सिनेमात श्रेयासोबत जिमी शेरगिल, माही गिल, रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत होते.
‘साहब बीवी और गँगस्टर’ सिनेमानंतर श्रेया नारायण हिने ‘रॉकस्टार’, ‘राजनीती’, ‘दस्तक’, ‘तनु वेड्स मनु’, ‘सुपर नानी’ यांसारख्या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. ‘सुपर नानी’ सिनेमात श्रेयाने आजारी मुलीची भूमिका साकारली होती. सिनेमातील अभिनेत्रीची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस देखील पडली…
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची नात श्रेया हिचा जन्म बिहारमधील मुझफ्फरपूर येथे झाला. अभिनेत्रीचं शिक्षण जयपूर येथे झालं. श्रेया जेव्हा चित्रपटसृष्टीत चांगले काम करत होती, तेव्हा तिच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. अभिनेत्रीच्या आईचं कर्करोगामुळे निधन झालं. आईच्या निधनानंतर अभिनेत्री पूर्णपणे कोलमडली होती.
श्रेयाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ‘पार्ट टाईम जॉब’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन पीयूष पांडे यांनी केलं आहे. शिवाय ‘पार्ट टाईम जॉब’ फक्त २१ मिनिटांची शॉर्ट फिल्म असणार आहे. ‘पार्ट टाईम जॉब’ सिनेमा सिनेमा ७ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे..