रणबीरच्या ‘रामायण’मधील 11 सेकंदांची क्लिप लीक? नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात; म्हणाले 1200 कोटींचा आदिपुरुष..
अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'रामायण' या चित्रपटातील एक क्लिप सोशल मीडियावर लीक झाली आहे. या क्लिपवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ही 11 सेकंदांची क्लिप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

अभिनेता रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाची प्रेक्षक अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटात रणबीर श्रीरामाच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाकॉन इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. याच ट्रेलरमधील 11 सेकंदांची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या अवतारात दिसून येत आहे. समोर उभ्या असलेल्या महाकाय राक्षसावर ते बाणाने निशाणा साधत आहेत. मात्र ही व्हायरल क्लिप चित्रपटातील आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. सोशल मीडियावर अनेक युजर्स ही क्लिप फेक असल्याचाही दावा करत आहेत. त्याचसोबत त्यावर भरभरून प्रतिक्रियाही येत आहेत.
या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर अत्यंत दमदार अवतारात दिसत आहे. प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तो धनुष्यबाणाने महाकाय राक्षसावर आक्रमकपणे हल्ला करताना दिसतोय. मात्र रणबीरपेक्षा त्या राक्षसानेच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा राक्षस हॉलिवूड चित्रपटातील गॉडझिलासारखा दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. ही क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावर मीम्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. ‘रामायणात हा कोणत्या प्रकारचा राक्षस होता’, असा सवाल एकाने केला. तर ‘हा गॉडझिला इथे कुठून आला’, असा गमतीशीर प्रश्न दुसऱ्या युजरने उपस्थित केला आहे. ‘मला 1200 कोटींच्या आदिपुरुषची आठवण येत आहे’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
पहा व्हिडीओ-
WTF 🤯🤯🤯
🚨🚨
RAMAYANA Leaked Scene 🔥🔥🔥 pic.twitter.com/1i5UwEGD8n— Mabbi_Gaadi_ Ruleee❤️🔥❤️🔥 (@ShruthiNai30968) July 1, 2026
ही 11 सेकंदांची क्लिप सध्या सोशल मीडियावर वेगाने शेअर केली जात आहे, परंतु निर्मात्यांकडून त्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे हे ‘रामायण’ या चित्रपटातील खरं फुटेज आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल. मात्र या व्हायरल व्हिडीओमुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच प्रचंड वाढली आहे. चाहते आता चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत.
‘ॲनिमल’च्या प्रचंड यशानंतर रणबीर कपूरने हा आव्हानात्मक प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे.