इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना

रश्मिका मंदानाच्या आईचा एक खासगी ऑडिओ सोशल मीडियावर लीक झाला. त्यानंतर तिने पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रश्मिकाची आई तिच्या मोडलेल्या साखरपुड्याबद्दल मोकळेपणे बोलत आहे.

इतके दिवस शांत बसले पण आता नाही..; आईचा खासगी ऑडिओ लीक होताच संतापली रश्मिका मंदाना
Rashmika Mandanna
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 13, 2026 | 9:58 AM

अभिनेत्री रश्मिका मंदाना पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न केल्याच्या काही दिवसांनंतर रश्मिकाची आई सुमन मंदाना यांचा एक खासगी ऑडिओ क्लिप लीक करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलीच्या पहिल्या साखरपुड्याविषयी बोलत आहेत. रश्मिकाने 2017 मध्ये कन्नड अभिनेता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता, परंतु लग्नाआधीच त्यांचं नातं मोडलं होतं. या दोघांमध्ये त्यावेळी कोणते मतभेद निर्माण झाले होते, याचा खुलासा तिच्या आईने केला होता. याप्रकरणी आता रश्मिकाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे ती क्लिप किंवा त्याविषयीचा कंटेंट पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

काय म्हणाली रश्मिका?

‘माझ्या आतापर्यंतच्या या अविश्वसनीय प्रवासात सोबत राहिलेल्या प्रियजनांना आणि या प्रकरणाशी संबंधित इतरांना.. माझ्याविरुद्ध मीडियातील एका विशिष्ट वर्गाकडून आणि ऑनलाइन लोकांकडून चुकीची माहिती, छळ आणि विशेष लक्ष्य करून टीका करण्याची मोहीम सुरू होऊन 8 वर्षे झाली आहेत. माझ्या शब्दांचा संदर्भ वेगळा सांगितला जातो, मी कधीही न उच्चारलेले शब्द माझ्याने नावाने चालवले जातात आणि माझ्याविरोधात द्वेष पसरवला जातो. या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होत होता, मी दुखावले गेले, तरी मी संयम आणि शांततेचा मार्गा निवडला होता. लोकांच्या सतत नजरेत असल्यामुळे कधीकधी अन्याय्य टीका होते, हे मी मान्य केलं. जोपर्यंत मी स्वत:शी प्रामाणिक राहीन, आनंदी राहीन, माझ्या अवतीभवती आनंद पसरवेन, तोपर्यंत सर्व ठीक असेल, असं मला वाटत होतं. परंतु गेल्या 24 तासांत जे घडलं, त्यामुळे एक अशी सीमा ओलांडली गेली, जी दुर्लक्ष केली जाऊ शकत नाही’, असं रश्मिकाने लिहिलं.

या पोस्टमध्ये तिने पुढे म्हटलंय, ‘जवळपास 8 वर्षांपूर्वीचं एक जुन खासगी संभाषण, जे संबंधिताच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय रेकॉर्ड करून केलं गेलं. त्या संभाषणाचा एक छोटा भाग आता जाणुनबुजून व्हायरल केला जातोय. मला अस्वस्थ करण्यासाठी, माझ्या वैयक्तीक आयुष्यातील घडामोडींचा फायदा उचलण्यासाठी, वाद निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरवला जातोय. लोक कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात? असं करून त्यांनी माझ्या कुटुंबाला, ज्यांच्याशी मी मैत्रीपूर्ण संबंध ठेवते त्या लोकांना आणि ज्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्यांना या अस्वस्थतेत ओढलं आहे. माझ्या गोपनीयतेवर हा मोठा आघात असून दिशाभूल करणारा, बदनामी करणारा कंटेट पसरवला जातोय. आयुष्यात आम्ही पुढे जाताना, सकारात्मकता पसरवताना काही लोक अजूनही दुसऱ्यांच्या आदर आणि शांतीच्या किंमतीवर समाजात द्वेष आणि वाद निर्माण करत आहेत. आठ वर्षांपासून हे सर्व वाद माझ्यापर्यंतच मर्यादित असल्यामुळे मी मौन बाळगणं पसंत केलं होतं. परंतु आता त्यात इतरही ओढले जात असताना मी आणखी गप्प राहू शकत नाही. मी एक सीमा आखण्याचा निर्णय घेतला आहे.’

रश्मिकाने आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. ‘मी सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, इन्फ्लुएन्सर आणि हा कंटेट किंवा त्याच्याशी संबंधित कथा पसरवणाऱ्यांना ते त्वरित काढून टाकण्याची विनंती करते. तुमच्याकडे 24 तासांचा अवधी आहे. हा कंटेंट काढून टाका, अन्यथा योग्य कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल. हे पाऊल हलक्यात घेतलेलं नाहीये, पण आता ते गरजेचं झालं आहे’, असं तिने या पोस्टच्या शेवटी स्पष्ट केलं आहे.

Follow Us