‘रात्रीस खेळ चाले’मधील अण्णा नाईकला ‘देवमाणूस’मध्ये पाहून चक्रावले प्रेक्षक

'देवमाणूस' या गाजलेल्या मालिकेचा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामधील जबरदस्त सरप्राइज आता समोर आलं आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका साकारलेले माधव अभ्यंकर या मालिकेत दिसणार आहेत.

रात्रीस खेळ चालेमधील अण्णा नाईकला देवमाणूसमध्ये पाहून चक्रावले प्रेक्षक
Madhav Abhyankar and Kiran Gaikwad
Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2025 | 11:45 AM

झी मराठी वाहिनीवर ‘देवमाणूस’ ही अत्यंत लोकप्रिय मालिका एका नव्या रुपात आणि नव्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रसारित झाल्यापासून नव्या सिझनविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामध्ये कोणकोणते कलाकार असणार, काय नवीन पहायला मिळणार, असे प्रश्न प्रेक्षकांकडून विचारले जाऊ लागले आहेत. ‘देवमाणूस- मधला अध्याय’मध्ये किरण गायकवाडच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत आधीच्या दोन सिझन्स गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेनं प्रेक्षकांची मनं जिंकलेली सरू आज्जी म्हणजे रुक्मिणी सुतारसुद्धा यामध्ये झळकणार आहे. त्याचसोबत अजून एक सरप्राइज या मालिकेतून प्रेक्षकांना मिळणार आहे. त्यावरून नुकताच पडदा उचलण्यात आला आहे.

या मालिकेतून अण्णा नाईक म्हणजेच जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर झी मराठीवर पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. त्यामुळे किरण गायकवाड आणि माधव अभ्यंकर यांच्यातली जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. माधव अभ्यंकर हे झी मराठीच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या गाजलेल्या मालिकेत अण्णा नाईकांच्या भूमिकेत होते. तसंच या मालिकेत पहिल्या दोन सिझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्रं पाहायला मिळणार आहेत. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेचा नवीन प्रोमो पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘रात्रीस देवमाणसाचे खेळ चाले’, असं एकाने लिहिलं. तर ‘अण्णा नाईक आणि देवमाणूस एकत्र, मज्जा येणार मग’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘सरू आज्जी, अण्णा नाईक, देवमाणूस.. बापरे काय मल्टिव्हर्स आहे हे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कुतूहल व्यक्त केलं आहे. ‘देवमाणूस : मधला अध्याय’ या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सिझनच्या मधली आहे. डॉक्टर अजितकुमार देव कातळवाडीतून निघून गेला होता. तो परत आल्यानंतर त्याला फाशी झाली. परंतु मधल्या काळात तो कुठे होता, काय करत होता, तिथेही तो कसा पोहोचला, त्याने कुणाला फसवलं, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला याची कथा या सिझनमध्ये पहायला मिळणार आहे. ‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका येत्या 2 जूनपासून दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.