Raveena Tandon : ’30 लोकांनी मला घेरलं, फोन खेचला..’ त्या घटनेबाबत रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा

बऱ्याच काळापूर्वी रवीना टंडनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. रवीना आणि तिच्या ड्रायव्हरवर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यावेळी नेमकं काय झालं हे सांगत, अभिनेत्रीने या संपूर्ण वादावर मौन सोडलं. सत्य काय तेही तिने सांगितलं.

Raveena Tandon : 30 लोकांनी मला घेरलं, फोन खेचला.. त्या घटनेबाबत रवीना टंडनचा धक्कादायक खुलासा
अभिनेत्री रविना टंडन
| Updated on: May 18, 2026 | 3:50 PM

अभिनेत्री रविना टंडन ही नेहमीच चर्चेत असते. पण 2 वर्षांपूर्वी ती तिच्या कामामुळे किंवा चित्रपटामुळे चर्चेत आली नव्हती, तर एका वादग्रस्त प्रकरणामुळे ती चर्चेत होती. एका महिलेला कथितरित्या मारहाण केल्याचा आरोप रवीन टंडन आणि तिच्या ड्रायव्हरवर लावण्यात आला होता. भरगर्दीत रवीना टंडन वाद घालत असतानाचा व्हिडिओही खूप व्हायरल झाला होता. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजलं होतं. आता बऱ्याच काळानंतर रविना टंडन हिने या सर्व गोष्टींवर मौन सोडलं असून त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, ते सांगितलं आहे.

रविनाने सांगितलं सत्य

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना रवीना टंडन हिने सत्य काय ते स्पष्टपे सांगितलं. “ ते पूर्णपणे खंडणी उकळण्याचं षडयंत्र होतं. आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज होतं, ज्यामुळे खरं काय ते लगेच समोर आलं. मी आधीही म्हटलंय की सोशल मीडियाचे फायदेही असतात आणि तोटेही. तो व्हिडिओ अशा प्रकारे एडिट करण्यात आला होता की सत्य वेगळे दिसावं” असा दावा रविनाने केला.

हा प्रकार म्हणजे पैसे, खंडणी उकळण्याचा कट आहे, असं पोलिसही म्हणाले होते, असं रविनाने सांगितलं. “पोलिसांनी सांगितलं होतं की हा संपूर्ण प्रकार पैसे उकळण्याचा प्लॅन होता. त्या लोकांना फक्त गोंधळ घालायचा होता,” असं ती म्हणाली.

ती रस्त्यावर का उतरली होती, हेही पुढे रविनाने स्पष्ट केलं.”काही लोक जबरदस्तीने माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, असं तिने सांगितलं. “ गर्दी करून लोकं माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होतं. माझी मुलं घरी होती आणि माझे पती (तेव्हा) ऑफिसमध्ये होते. मी कोणालाही घरात घुसू दिलं असतं का? मी नक्कीच समोर उभी राहिले असते, पण ते लोक आम्हाला घाबरवून, पैशांसाठी तडजोड करवून घ्यायचा प्रयत्न करत होते” असा दावा रविनाने केला.

रविनाच्या ड्रायव्हरवर लावले होते आरोप

या प्रकरणी तेव्हा एका व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये एका व्यक्तीने असा दावा केला होता की रवीनाच्या ड्रायव्हरने त्याच्या आईला धडक दिली. आणि प्रश्न विचारल्यावर रवीनाने स्वतः त्या महिलेला मारहाण केली. मात्र, ज्या इमारतीजवळ ही घटना घडली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसलं की त्या महिला कारजवळ होत्या, पण त्यांना धडक लागली नव्हती. त्यानंतर गर्दी भडकली आणि प्रकरण वाढलं.

यासंदर्भात रवीना म्हणावी की, “गर्दीशी बोलण्यासाठी मी जेव्हा कारमधून उतरले, तेव्हा माझ्यासोबत धक्काबुक्की झाली”. “प्लीज मला मारू नका” असं म्हणतानाही तिचा आवाज व्हिडीओमध्ये ऐकू आला होता. मात्र आरोप करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की रवीना टंडन नशेत होती आणि तिने महिलेवर हल्ला केला.

या घटनेनंतर काही लोक रवीना आणि त्यांच्या ड्रायव्हरला घेरायला आले होते. त्यावरही रवीना टंडन स्पष्टपणे बोलली – “ते विनाकारण माझ्या ड्रायव्हरला दोष देत होते, तसं काही झालंच नव्हतं. मी त्या भागातील लोकांना ओळखते.  मला वाटलं की जर त्या महिला कोणाच्या पाहुण्या असतील तर मी जाऊन ड्रायव्हरच्या वतीने माफी मागेन. पण ते त्याच क्षणाची ( मी बाहेर पडण्याची) वाट पहात होते, हे मला तेव्हाच जाणवलं. माझा ड्रायव्हर एकटाच होता. ते लोक माझ्या घराचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून त्याने त्यांचा फोन खाली केला. एवढ्यावरून ती महिला भडकली, ‘ तू मला कसा स्पर्श करू शकतोस? मी तुझ्याविरोधात तक्रार करीन, ” असं ती म्हणाल्याचं रविनाने सांगितलं.

रविनाने वाचवला ड्रायव्हरचा जीव

माझ्या ड्रायव्हरवर खोटा गुन्हा दाखल केला जाईल अशी भीती मला वाटली, म्हणून मी स्वतः बोलण्यासाठी बाहेर गेले. “मी बाहेर येताच तिथे सुमारे ३० लोक जमले होते. माझ्या ड्रायव्हरने मला आत ओढले आणि मी पोलिसांना फोन केला, पण तो (ड्रायव्हर)  बाहेरच राहिला. त्यानंतर लोकांनी त्याला मारहाण सुरू केली.” असं रवीनाने नमूद केलं.

“ड्रायव्हरला मारहाण होताना दिसताच मी बाहेर पडले आणि त्याला आता खेचलं. मी त्याला वर जाऊन मुलांसोबत बसायला सांगितलं. जर ड्रायव्हरला बाहेर पाठवलं नाही तर त्याचा मृतदेह मिळेल” अशा धमक्या लोकांनी दिल्याचा दावाही रवीनाने केला.

“माझा ड्रायव्हर 10 वर्षांपासून माझ्यासोबत आहे, त्याला बाहेर सोडलं असतं, तर त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण कली असती आणि तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला असता. मी बाहेर येऊन त्यांचं (लोकांचं)  ऐकावं आणि पैसे द्यावं, यासाठीच हे सगळं सुरू होतं”, असं रवीना टंडन म्हणाली. आम्ही तिघी महिला होतो आणि सुमारे 30 लोक तिते समोर होते. ते खूप भीतीदायक होतं. मी जेव्हा पोलिसांना फोन करण्याबद्दल बोलले, तेव्हा त्यांनी माझा फोनही हिसकावून घेतला ” असा भयानक अनुभव तिने सांगितला.

Follow Us