‘तुझ्यापेक्षा मोठी गोल्ड डिगर..’; रिया चक्रवर्तीचं वक्तव्य ऐकून सुष्मिता अवाक्!

आपल्या 32 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या पॉडकास्टची सुरुवात केली आहे. या पॉडकास्टच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन पाहुणी म्हणून उपस्थित राहिली आहे. त्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुझ्यापेक्षा मोठी गोल्ड डिगर..; रिया चक्रवर्तीचं वक्तव्य ऐकून सुष्मिता अवाक्!
Rhea Chakraborty and Sushmita Sen
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2024 | 11:15 AM

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता पॉडकास्टच्या विश्वात पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. ‘चाप्टर 2’ असं तिच्या पॉडकास्ट शोचं नाव असून त्याचा टीझर तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. रियाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने पाहुणी म्हणून हजेरी लावली आहे. या एपिसोडच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये दोघी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या ‘गोल्ड डिगर’च्या ठपक्याविषयी आणि ऑनलाइन ट्रोलिंगविषयी मोकळेपणे बोलताना दिसत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रिया प्रकाशझोतात आली. तिच्यावर बरेच गंभीर आरोप झाले आणि त्यासाठी तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. दुसरीकडे आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे सुष्मिताला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

पॉडकास्टच्या या प्रोमोमध्ये रिया सुष्मिताला म्हणते, “तुला माहितीये का, या रुममध्ये तुझ्यापेक्षा मोठी ‘गोल्ड डिगर’ (पैशांसाठी श्रीमंत व्यक्तींसोबत रिलेशनशिपमध्ये राहणारी किंवा त्यांच्याशी लग्न करणारी) आहे?” त्यावर सुष्मिता हसत विचारते, “ओह, तू सुद्धा का?” तेव्हा रिया तिला म्हणते, “मी तुझ्यापेक्षाही मोठी (गोल्ड डिगर) आहे.” रिया आणि सुष्मिता या दोघींनाही ‘गोल्ड डिगर’ म्हटलं गेलं होतं. 2022 मध्ये ललित मोदीने सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करून रिलेशनशिप जाहीर केलं होतं. तेव्हा ट्रोलर्सनी तिला ‘गोल्ड डिगर’ म्हटलं होतं. त्यावर सुष्मिताने टीकाकारांना सडेतोड उत्तरसुद्धा दिलं होतं. “मी सोन्यापेक्षाही खोल खणते आणि मला नेहमीच डायमंड्स आवडतात. विशेष म्हणजे ते सर्व मी स्वत: माझ्यासाठी खरेदी करते”, अशा उपरोधिक स्वरात तिने ट्रोलर्सचं तोंड बंद केलं होतं.

रियाने नुकताच तिचा 32 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचं औचित्य साधत तिने तिच्या या पॉडकास्टची घोषणा केली. या पोस्टमध्ये रियाने तिच्या मागच्या चार वर्षांच्या प्रवासाकडे लक्ष वेधलं. ‘मी कालच 32 वर्षांची झाले आणि आतापर्यंतचा प्रवास खूप भारी होता. गेली चार वर्षे ही बदल, विकास आणि स्वत:चं असं व्हर्जन होण्याची होती, जे मला आवडतंय. हाच प्रवास साजरा करण्यासाठी मी काही खास तुमच्या भेटीला आणतेय’, असं तिने या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. सुशांतच्या निधनानंतर रियावर ड्रग्ज पुरवल्याचा, पैसे उकळल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणी ईडीकडून तिची चौकशी झाली. तर ड्रग्ज प्रकरणात तिला तुरुंगात जावं लागलं. तुरुंगात बरेच दिवस राहिल्यानंतर तिची जामिनावर सुटका झाली.