
बॉलिवूडमध्ये अनेक स्टार होते, आहेत जे त्यांच्या अभिनय, चित्रपटांसोबतच वैयक्तिक कारणांसाठीही तेवढेच चर्चेत राहिले आहेत. स्पष्टवक्ते म्हणून चर्चेत राहिले आहेत. त्यातीलच एक होते ऋषी कपूर. कपूर परिवारातील तसे सगळेच स्टार आहेत पण ऋषी कपूर हे विशेष करून जास्त चर्चेत राहिलेलं नाव.एक काळ असाही होता जेव्हा प्रत्येक तरुण त्यांच्यासारखे दिसू इच्छित होता. पण पडद्यामागे, ऋषी कपूर यांचे आयुष्य सामान्य माणसासारखेच होते.
ऋषी कपूर यांना अनेक वाईट सवयी देखील
दरम्यान ऋषी कपूर यांच्या काही सवयींबद्दल किंवा वागण्याच्या पद्धतींबद्दल अनेकदा नीतू कपूर यांनी त्यांच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे. ऋषी कपूर यांना अनेक वाईट सवयी देखील होत्या ज्यामुळे अनेकदा त्यांच्या घरात वादही झालेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सिगारेट ओढणे. ते प्रचंड प्रमाणात सिगारेट ओढत असतं. ते चेन स्मोकर होते असं म्हटलं जायचं. पण एके दिवशी एका गोष्टीने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ती गोष्ट ऋषी कपूर यांच्या मनाला इतकी लागली की त्याच दिवशी त्यांनी कायमचे धूम्रपान सोडून दिले.
धूम्रपान सोडल्याची गोष्ट त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे
ऋषी कपूर यांनी धूम्रपान सोडल्याची जी गोष्ट आहे ती त्यांनी त्यांच्या पुस्तकातही लिहिली आहे. ते केवळ मोठ्या पडद्यावरचे नायक नव्हते तर त्यांच्या कुटुंबासाठी एक जबाबदार व्यक्ती देखील होते. मीना अय्यर यांनी लिहिलेल्या आणि हार्पर कॉलिन्स यांनी प्रकाशित केलेल्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात त्यांनी हे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीपासून ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या अनेक अनकही पैलूंवर मोकळेपणाने भाष्य केले.
“तुझ्या तोंडातून दुर्गंधी येते”
त्यांनी पुस्तकाच्या माध्यमातून हा प्रसंग सांगताना म्हटलं की, “मी खूप धूम्रपान करायचो, पण जेव्हा माझी मुलगी म्हणाली, ‘तुझ्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याने मी सकाळी तुला किस करणार नाही.’ ती गोष्ट मला एवढी लागली की मी तेव्हापासून धूम्रपान सोडले . त्या दिवसापासून मी सिगारेटला हात लावला नाही.”
रणबीर कपूरसोबत कडक वडील म्हणून वागले
ऋषी कपूर त्यांचा मुलगा रणबीर कपूरसोबत थोडे कडक होते. त्यांनी स्वतः देखील हे कबूल केले आहे की, ते मित्रासारखे वडील होऊ शकले नाही. त्यांनी ही गोष्ट मनापासून स्वीकारली आणि सांगितले की रणबीर त्यांच्या मुलांसोबत नक्कीच वेगळ्या पद्धतीने वागेल.
कपूर कुटुंबातून बाल कलाकार
ऋषी कपूर यांनी 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील प्रसिद्ध कपूर कुटुंबातून बाल कलाकार म्हणून सुरुवात केली. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या नावांपैकी एक होते. त्यांना लहानपणापासूनच चित्रपटांची ओळख होती. त्यांनी पहिल्यांदा 1970 च्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात बाल कलाकार म्हणून पडद्यावर काम केले आणि त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण, 1973 मध्ये ‘बॉबी’ चित्रपटातून त्यांना खरा स्टारडम मिळाला. 21 वर्षीय ऋषी यांनी एका कॉलेज बॉयची भूमिका त्या चित्रपटात साकारली होती.
150 चित्रपटांमध्ये काम
ऋषी कपूर यांनी 150 चित्रपटांमध्ये काम केले आहे . ऋषी कपूर यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांना ‘बॉबी’ साठी फिल्मफेअर पुरस्कार, ‘दो दूनी चार’ साठी क्रिटिक्स पुरस्कार आणि ‘कपूर अँड सन्स’ साठी सर्वोत्कृष्ट सह-कलाकार पुरस्कार मिळाला आहे.
कर्करोगामुळे निधन
2018 मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले आणि ते उपचारासाठी न्यू यॉर्कला गेले. जवळजवळ एक वर्ष उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण अखेर त्यांची तब्येत नंतर पुन्हा खालावू लागली.अखेर 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला.