रोहित शेट्टीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 20 कोटींची मागणी, व्हायरल ऑडिओनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ

पुन्हा एका रोहित शेट्टीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून आता थेट 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत.

रोहित शेट्टीला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, 20 कोटींची मागणी, व्हायरल ऑडिओनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ
| Updated on: Jun 28, 2026 | 12:55 PM

Rohit Shetty : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने ऑडिओ कॉलद्वारे रोहित शेट्टीच्या स्टाफशी संपर्क साधून 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. मागितलेली रक्कम न दिल्यास यावेळी थेट रोहित शेट्टीला लक्ष्य केले जाईल, अशी धमकी या कॉलमध्ये देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

ही घटना काही महिन्यांपूर्वी रोहित शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर घडल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

90 सेकंदांची धमकीची ऑडिओ क्लिप

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी रोहित शेट्टीच्या स्टाफला सुमारे 90 सेकंदांची ऑडिओ क्लिप प्राप्त झाली. या क्लिपमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा निकटवर्तीय सहकारी शुभम लोणकर याचा आवाज असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शुभम लोणकर हा 2024 मध्ये घडलेल्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात तसेच फेब्रुवारी 2026 मध्ये रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही फरार आरोपी असल्याचे सांगितले जात आहे.

फॉरेन्सिक तपासासाठी ऑडिओ पाठवला

मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टीच्या स्टाफने ही धमकीची ऑडिओ क्लिप तात्काळ पोलिसांकडे सुपूर्द केली आहे. जुहू पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्राथमिक तपासात आवाज शुभम लोणकर याचाच असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, याची खात्री करण्यासाठी ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, अज्ञात कॉल करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक कार्यरत केले असून, तांत्रिक तपासही सुरू आहे.

यापूर्वीही झाला होता गोळीबार

यापूर्वी 31 जानेवारी रोजी उशिरा रात्री जुहूतील महमूद चौक परिसरात असलेल्या रोहित शेट्टीच्या घराबाहेर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता.

या प्रकरणात दीपक शर्मा नावाच्या आरोपीने दुचाकीवरून येत गोळीबार केला होता. नंतर त्याला आग्रा येथून अटक करण्यात आली. चौकशीत दीपकने सोशल मीडियावरील लॉरेन्स टोळीशी संबंधित पोस्ट पाहून तो या टोळीच्या संपर्कात आल्याची कबुली दिली होती.

Follow Us