वडील ICU मध्ये अन् डेडलाइन डोक्यावर; रुग्णालयाच्या छतावर लिहिलं हे रोमँटिक गीत

नव्वदच्या दशकातील 'साजन' चित्रपटातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे. मात्र, गीतकार समीर यांनी वडिलांच्या गंभीर आजारावेळी रुग्णालयाच्या छतावर हे गीत लिहिलं. अत्यंत भावनिक परिस्थितीत व्यावसायिक जबाबदारी पूर्ण करत त्यांच्या लेखणीतून हे अजरामर गीत साकारलं.

वडील ICU मध्ये अन् डेडलाइन डोक्यावर; रुग्णालयाच्या छतावर लिहिलं हे रोमँटिक गीत
| Updated on: Sep 25, 2026 | 6:55 PM

90 च्या दशकातील चित्रपट आणि गाण्यांचा विषय निघाला की ‘साजन’ चित्रपट आणि त्यातल्या ‘देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार’ हे गाणं आठवणार नाही असं होणं शक्यच नाही. 1991 साली रिलीज झालेल्या या चित्रपटात संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान हे त्रिकूट प्रेक्षकांना पहायला मिळालं. विशेषतः या गाण्यातील माधुरी आणि सलमान खानची केमिस्ट्री चाहत्यांच्या मनात आजही ताजी आहे. अलका याज्ञिक आणि एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या सुमधुर आवाजाने नटलेलं हे गाण, त्याला मिळालेलं नदीम-श्रवण यांचं संगीत आणि समीर अंजान यांनी लिहीलेले बोल- यामुळे हे गाणं आजही अजरामर आहे. मात्र, या लोकप्रिय गाण्याच्या निर्मितीमागची कहाणी ऐकली तर ती त्याहूनही अधिक भावूक करणारी आहे.

हॉस्पिटलच्या छतावर लिहीलं हे रोमँटिक गाणं

गीतकार समीर अंजानी यांनी एका मुलाखतीत या गाण्याबद्दलचा किस्सा सांगितला होता. ‘देखा है पहली बार’ हे गाणे समीर अंजान यांनी अशा परिस्थितीत लिहिले होते, जेव्हा त्यांचे वडील मुंबईतील नानावटी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये जीवन-मृत्यूशी झुंज देत होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी कुटुंबीयांनाही परिस्थितीची कल्पना दिली होती. एवढं तणावपूर्ण आणि भावनिक वातावरण असताना रुग्णालयाच्या छतावर फेरी मारत असतानाच समीर यांनी या रोमँटिक गाण्याचे बोल लिहीले होते. एकीकडे वडीलांची चिंताजनक प्रकृती आणि दुसरीकडे चित्रपटासाठीचं गाणं पूर्ण करण्याची जबाबदारी – असा दुहेरी दबाव मनावर असातना समीर यांच्या लेखणीतून हे गीत साकारलं.

आणि त्याच काळात संगीतकार नदीमही हे गाणं लौकर पूर्ण करून द्यायला सांगत होते. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगातून जात असतानाही समीर यांनी आपली व्यावसायिक जबाबदारी पूर्ण केली. पुढे हेच गाणे 90च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक गाण्यांपैकी एक ठरलं. जे रसिकांच्या ओठावर आजही असतं.

गाणं चित्रपटात येणार तरी कसं हा होता प्रश्न

या गाण्याच्या निर्मितीची कहाणी इथेच संपत नाही. चित्रपटाचं शूटिंग जवळपास पूर्ण झाल्यानंतर या पिक्चरच्या म्युझिकमध्ये आणखी एका गाण्याची गरज आहे, असं दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांना जाणवसं. त्यानंतर नदीम-श्रवण यांनी ‘देखा है पहली बार’ गाण तयार केलं. मात्र चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली होती. त्यामुळे निर्मात्यांसमोर आणखी एक अडचण उभी राहिली ती म्हणजे —अभिनेता सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या तारखा मिळवण्याची..

अखेर शूटिंगचा मार्ग झाला मोकळा

मग सलमान आणि माधुरीला हे गाणं ऐकवण्यात आलं. त्यांना ते खूप आवडलं, अखेर सलमानने गाण्याच्या शूटिंगसाठी वेळ काढण्याची तयारी दर्शवली. दोघांनीही ऊटी गाठलं आणि तिथेच या गाण्याचं संपूर्ण शूटिंग झालं. पडद्यावर सलमान आणि माधुरीची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी भावली की पुढे हे गाणं ‘साजन’च्या सर्वात यादगार गाण्यांपैकी एक बनलं.

साजन ठरला हिट

‘साजन’चं दिग्दर्शन लॉरेन्स डिसूझा यांनी केलं आणि सुधाकर बोकाडे हे निर्माते होते. या फिल्ममध्ये संजय दत्तने अमन/सागर, माधुरी दीक्षितने पूजा आणि सलमान खानने आकाश अशा भूमिका साकारल्या. मैत्री, प्रेम आणि त्याग याभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप भावली. 30 ऑगस्ट 1991 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘साजन’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. ‘देखा है पहली बार’, ‘मेरा दिल भी कितना पागल है’, ‘जिए तो जिए कैसे’ आणि ‘बहुत प्यार करते हैं’ यांसारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाच्या संगीतासाठी नदीम-श्रवण यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us