Sachin Pilgaonkar : स्वतःचे मीम्स पाहून हसतात सचिन पिळगांवकर ? ट्रोलिंगबद्दल अभिनेत्याने केला मोठा खुलासा
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी अलीकडील मुलाखतीत सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि मीम्सवर आपली परखड भूमिका मांडली. स्वतःवरील विनोदबुद्धीमुळे अनेक मीम्सचा आनंद घेतो, मात्र खालच्या पातळीवरील टीकेला नापसंती व्यक्त केली. ट्रोलिंग तात्पुरते असून, दीर्घकाळ टिकणारे चांगले काम निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला आणि तरुणांनाही हाच संदेश दिला.

‘हा माझा मार्ग एकला’ .. कित्येक दशकांपूर्वी आलेल्या या चित्रपटापासून मनोरंजन क्षेत्रात प्रवास सुरू करणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे सचिव पिळगांवकर.. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टेलिव्हिजन क्षेत्रातही आपल्या अभिनय-दिग्दर्शनाने , कामाने दबदबा निर्माण करणारे म्हणून सचिन पिळगावकरांची ओळख. त्यांचे अशी ही बनाबनवी, आमच्यासारखे आम्ही, नवरा माझा नवसाचा हे मराठी चित्रपट असो किंवा नदीया के पार, शोले मधील त्यांची भूमिका.. सचिन पिळगावंकर मोठ्या पडद्यावर किंवा टीव्हीवर दिसताच प्रेक्षक तिथे खिळून राहतात हे नक्कीच. मात्र, आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे सचिन पिळगांवकर यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.
सचिन पिळगांवकर विविध विषयांवर परखडपणे आपली भूमिका मांडतात. त्यांच्या विधानांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. मात्र, काही वक्तव्यांवरून त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं. त्यांच्या विधानांवरून मीम्सही बनवले जातात. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एका मुलाखतीत मीम्स, तसेच ट्रोलिंगबाबत आपली भूमिका मांडली. नुकतंच अमुक तमुकचे सूत्रसंचालक ओमकार जाधव यांनी सचिन यांची माफी मागितली. ” मला अतिशय प्रामाणिकपणे इंटरनेटच्या वतीने तुमची माफी मागायची आहे. याआधी कोणी अशा पद्धतीने तुमची माफी मागितली आहे की नाही हे मला नाहीत. पण मी हे मनापासून करतोय. यामागे माझा कोणताही अजेंडा नाही. तुमच्याबाबत ज्या वेगवेगळ्या चर्चा होतात, ज्या प्रकारचे मीम्स बनवले जातात आणि ज्या पद्धतीने ट्रोलिंग केलं जातं, ते आम्ही पाहतो. तुमच्या कामाचे चाहते आणि प्रेक्षक म्हणून, हल्ली ज्या प्रमाणात तुमचं ट्रोलिंग होतंय, प्रेक्षक म्हणून आम्हाला त्रास होतो, तर तुम्हालाही होत असेल. तर त्याबद्दल मला तुमची माफी मागायची आहे.” असं तो म्हणाला.
काय म्हणाले सचिन पिळगांवकर ?
ओमकारने माफी मागितल्यानंतर सचिन पिळगांवकर यांनी ट्रोलिंग आणि मीम्सबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. प्रत्येक मीम्सकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी काही मीम्सचा आनंद घेत असल्याचंही नमूद केलं ” अरे खरंच सॉरी म्हणायची गरज नाही. मी सुद्धा ते समजू शकतो. परमेश्वराच्या कृपेने मला सेन्स ऑफ ह्युमर आहे.विनोदबुद्धी शाबूत आहे. त्यामुळे मला स्वत:वरसुद्धा हसायला कूप आवडतं. कारण मला असं वाटतं, माझ्यावर जे संस्कार झाले आहेत, त्यांनीमला शिकवलं आहे, की माणूस जेव्हा स्वत:वर हसायला शिकतो किंवा स्वत:वर हसू शकतो, त्याचा सेन्स ऑफ ह्यूमर खूप हेल्दी असतो. ही गोष्ट मला स्वतःमध्ये सापडली. मीसुद्धा स्वतःवर खूप हसू शकतो.”
पुढे मीम्सबद्दल बोलताना ते म्हणाले, “ तू या मीम्सबद्दल बोलतोयस ना, त्यातल्या काही गोष्टी विनोदी असतात आणि त्यावर मीसुद्धा हसतो. मी ते मीम्स माझ्या मित्रांनाही पाठवतो. पण काही गोष्टींमध्ये शिवीगाळ असते किंवा खालच्या पातळीवरचा विनोद असतो. अशा गोष्टींचा मी आनंद घेत नाही. कारण मीसुद्धा माणूस आहे.”
‘सुरुवातीला हे थोडं शॉकिंग होतं’; ट्रोलिंगच्या अनुभवावर भाष्य
सोशल मीडियावरील ट्रोलिंगचा सुरुवातीला कसा अनुभव आला, याबद्दलही सचिन पिळगांवकर यांनी सांगितलं. सुरुवातीला हा प्रकार त्यांच्यासाठी नवीन असल्याने आश्चर्य वाटलं होतं; मात्र त्याचा फारसा त्रास झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले,” या गोष्टींचा त्रास होत नाही मला अजिबात. सुरूवातीला जेव्हा हे नवीन होतं ना, ते माझ्याकडे नवीन होतं, थोडं शॉकिंग होतं, त्रासदायक नव्हतं. पण मग म्हटलं हे काय आहे, हे काय सुरू झालं ? कारण माझ्याही चित्रपटात तू कधीही असा अश्लील विनोद किंवा काही असं पाहिलं नसशील. कारण आपण नाही तसे चित्रपट बनवत किंवा प्रेक्षकांसमोर आपल्याला तसं नाही यायचंय. याचा अर्थ आपण आपल्या मित्रांबरोबर असताना काही नॉटी गोष्टी म्हणत नाही , बोलत नाही, अशातला भाग नाही ना. आपण काही देव किंवा साधू नाहीयोत. आपण माणूस आहोत, तर वैयक्तिक आयुष्यात आपण काही गोष्टी करत असलो आपल्या मित्रांबरोबर, त्या गोष्टी सिनेमात आपण नाही करू शकत ना.. त्या गोष्टी वेगळ्या आहेत. आणि माझा विश्वास एका गोष्टीवरती आहे, या कॉमेंट्स आणि या अशा प्रकारच्या निगेटिव्हिटी वगैरे ना, हे लाँग लास्टिंग कधीच नसतं.” असं त्यांनी नमूद केलं.
आयुष्यभर पुरेल असं काही करा..
” तुम्हाला लाँग लास्टिंग काही हवं असेल तर काँटेंट चांगला क्रिएट केला पाहिजे, ते आयुष्यभर पुरणारं असतं. या गोष्टी आयुष्यभर पुरणार नाहीयेत, याची जाणीव जर झाली तर गंमत आहे. ती जाणीव होत नाही. ही पोरं जी आहेत ना सगळी ही सगळी यंगस्टर्स आहेत. त्यातली काही डॉक्टर्स वगैरे पण असतील कदाचित, शिकली-सवरलेली पण असतील, पण ती माझ्याकरिता पोरं आहेत. माझ्या वयाच्या वयानं वडील म्हणून मला ती माझी पोरं वाटतात आणि मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो की तुम्ही हे करताय करा, आता तुमच्या या फावल्या वेळेत तुम्हाला तसं करावसं वाटतंय, करा. बट ॲट द सेम टाईम असं काहीतरी सुद्धा आयुष्यात करा, की जे तुमच्याबरोबर आयुष्यभर राहील, हे नाही राहणार.” असा सल्ला त्यांनी दिला.