सैफ अली खानला मिळाला 35 लाख रुपयांचा मेडिक्लेम; डॉक्टरकडून प्रश्न उपस्थित

अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच एका डॉक्टरने सैफला मिळणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स क्लेमच्या रकमेवरून वीमा कंपनीवर प्रश्न उपस्थित केला आहे. सर्वसामान्य व्यक्तीला इतका मोठा क्लेम क्वचितच मिळत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.

सैफ अली खानला मिळाला 35 लाख रुपयांचा मेडिक्लेम; डॉक्टरकडून प्रश्न उपस्थित
सैफ अली खान
| Updated on: Jan 21, 2025 | 2:25 PM

अभिनेता सैफ अली खानच्या उपचारासाठी मिळणाऱ्या हेल्थ इन्शुरन्स क्लेमवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील एका डॉक्टरने क्लेमच्या रकमेवरून वीमा कंपनीवर प्रश्न उपस्थित केला आहे. वीमा कंपनीने जितक्या लाख रुपयांचा क्लेम सैफसाठी अप्रूव्ह केला आहे, तेवढा क्वचितच एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला क्लेम मिळतो, असं त्यांनी म्हटलंय. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, कार्डिअॅक सर्जन डॉ. प्रशांत मिश्रा यांनी सैफच्या क्लेम अप्रूव्हलवरून सवाल केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, इन्शुन्स कंपनीने सैफसाठी जितकी रक्कम पारित केली आहे, तेवढी कोणा दुसऱ्या सर्वसामान्य पॉलिसी होल्डरला क्वचितच मिळत असेल. मध्यमवर्गीय पॉलिसी होल्डर्सना 5 लाख रुपयांहून अधिकचा क्लेम हवा असेल तरी बरेच कष्ट घ्यावे लागतात, असं त्यांनी म्हटलंय.

डॉ. प्रशांत यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरील पोस्टमध्ये लिहिलंय, ‘अशा प्रकारच्या उपचारांसाठी लहान रुग्णालये आणि सर्वसामान्य लोकांसाठी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे निवा बुपा देणार नाही. सर्व फाइव्ह स्टार रुग्णालये जास्त शुल्क आकारत आहेत आणि मेडिक्लेम कंपन्याही त्याला मान्यता देत आहेत. परंतु यामुळे प्रीमियमचा खर्च वाढतोय आणि मध्यमवर्गीयांना त्रास सहन करावा लागतोय.’ त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी आपापले अनुभव सांगितले आहेत. एका युजरने क्लेमसंदर्भात नाराजी व्यक्त केली. ‘माझ्या उपचारासाठी कंपनीने संपूर्ण पैसे पारित केले नव्हते’, असं त्याने म्हटलंय. तर दुसऱ्या युजरने आरोग्य यंत्रणेत बदल करण्याची गरज असल्याचं सुचवलं.

16 जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानवर त्याच्यात राहत्या घरी चाकूहल्ला करण्यात आला होता. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोराने सैफवर सहा वार केले. त्यानंतर त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफच्या उपचारासाठी वीमा कंपनीकडे 35.95 लाख रुपये मागण्यात आले होते. ही रक्कम कंपनीनेही त्वरित पारित केली. सुरुवातीच्या उपचारांसाठी 25 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. नंतर अंतिम बिल आल्यानंतर पॉलिसी नियमांनुसार संपूर्ण रक्कम दिली जाईल, असं सांगण्यात आलं.

सैफ अली खानकडे Niva Bupa Health Insurance कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आहे. कंपनीने स्वत: कबूल केलं होतं की सैफने उपचार सुरू करण्यासाठी कॅशलेस ट्रीटमेंटची मागणी केली होती. ज्याला कंपनीने मान्यता दिली. यानंतर अंतिम बिल प्राप्त झाल्यानंतर, संपूर्ण रकमेच्या सेटलमेंटसाठी पॉलिसीच्या नियमांचा उल्लेख करण्यात आला.