सैफ अली खानने अमृता सिंहसोबतच्या लग्नाबद्दल सोडलं मौन; म्हणाला “लोक चपलेनं मारतील..”

अभिनेता सैफ अली खानने इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधीच त्याच्यापेक्षा वयाने बरीच मोठी असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्न आणि बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित एक प्रसंग सांगितला आहे.

सैफ अली खानने अमृता सिंहसोबतच्या लग्नाबद्दल सोडलं मौन; म्हणाला लोक चपलेनं मारतील..
Saif Ali Khan and Amrita Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: May 20, 2026 | 10:25 AM

अभिनेता सैफ अली खानने 1993 मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करण्याआधीच 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न केलं होतं. त्यावेळी सैफ फक्त 21 वर्षांचा आणि अमृता 33 वर्षांची होती. सैफला ‘बेखुदी’ या चित्रपटातून इंडस्ट्रीत लाँच करायचं होतं, परंतु पहिल्या शूटिंग शेड्युलनंतर हा चित्रपट रखडला होता. या चित्रपटातून बाहेर पडण्याचं एक कारण त्याचं अमृता सिंहशी अफेअर असल्याचंही म्हटलं जातं. आता इतक्या वर्षांनंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “मला अजूनही आठवतंय की, एक ज्येष्ठ अभिनेते होते, ज्यांनी मला माझं लग्न झाल्याचं सर्वांपासून लपवण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी मला असं म्हटलं होतं, हे मला त्यावेळी समजलंच नव्हतं. कदाचित त्यांचा असा अर्थ असेल की माझ्या इमेजवर परिणाम होईल आणि माझी फॅन फॉलोईंग कमी होईल. पण आतापर्यंत मला मिळालेला तो सर्वांत वाईट आणि विचित्र सल्ला होता.”

सैफची कौटुंबिक पार्श्वभूमी जरी चित्रपटाशी संबंधित असली तरी त्याचं करिअर इतकं सोपं नव्हतं. त्याने असाही खुलासा केला की एका दिग्दर्शकाने त्याला पोलिसाची भूमिका साकारू नकोस, असा सल्ला दिला होता. कारण त्याला वाटत होतं की, त्यामुळे सैफ हास्यास्पद दिसेल. सैफची सर्वांत मोठी भीती हीच होती की, त्याची चेष्टा केली जाईल. याविषयी तो पुढे म्हणाला, “जेव्हा मी काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझी सर्वांत मोठी भीती हीच होती की लोकांनी माझ्यावर हसू नये. एक दिग्दर्शक मला म्हणाला होता की, लोक माझ्यावर चपला फेकतील, माझ्यावर हसतील, माझा तिरस्कार करतील आणि मग मला काम मिळणार नाही.”

“मी हे मान्य करतो की, एखादा कलाकार जेव्हा करिअरची सुरुवात करतो, तेव्हा त्याला प्रेक्षकांसमोर विचित्र दिसायचं नसतं किंवा कोणीच त्याच्यावर हसू नये असं त्याला वाटत असतं. एकदा तुम्ही हा टप्पा ओलांडला की, मग तुम्हाला थेट मिस्टर बच्चन बनावंसं वाटू शकतं. पण या सगळ्याची सुरुवात तिथूनच होते. मी माझ्या कलेवर खूप मेहनत घेतली आणि माझं काम पवित्र राहावं यासाठी प्रामाणिकपणे वागण्याचा निश्चय केला. हेच नेहमी माझं तत्त्वज्ञान राहिलं आहे”, असं सैफने स्पष्ट केलं.

‘बेखुदी’ या पहिल्यावहिल्या चित्रपटादरम्यान निर्माते राहुल रावेल यांनी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. ही अट सैफची तत्कालीन गर्लफ्रेंड अमृता सिंहशी संबंधित होती. एकतर तिच्याशी ब्रेकअप कर किंवा चित्रपटात काम कर, अशी अट निर्मात्यांनी घालताच सैफने गर्लफ्रेंडला निवडलं आणि ‘बेखुदी’ हा चित्रपट सोडला होता. नंतर राहुल रावेल यांनी त्यांची वेगळीच बाजू मांडली होती. सैफने चुकीचं सांगितलं, खरं तर तो बेजबाबदार होता आणि शूटिंगसाठी वेळेवर आला नाही, त्यामुळे मला वाईट वाटलं, असं त्यांनी म्हटलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us