‘सैराट’मधल्या ‘सल्या’ची वडिलांसाठी हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट; ‘असं सोडून जायचं नव्हतं..’

'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. सोलापुरातल्या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर अरबाजने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.

सैराटमधल्या सल्याची वडिलांसाठी हृदय पिळवटून टाकणारी पोस्ट; असं सोडून जायचं नव्हतं..
अरबाज शेख आणि त्याचे वडील अस्लम शेख
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2026 | 12:11 PM

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरबाजचे वडील अस्लम शेख यांचं गुरुवारी सकाळी सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या महिनाभरापासून ते आजारी होती. मेंदू विषयक विकारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वडिलांच्या निधनानंतर अरबाज पूर्णपणे खचला असून त्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

वडिलांचे फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘असं सोडून जायचं नव्हतं.’ अरबाजच्या या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. तर काहींनी ‘काळजी घे मित्रा’ असं म्हणत त्याचं सांत्वन केलं. काही दिवसांपूर्वीच अरबाजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये त्याने सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्याने उपचारासाठी त्यांना सोलापुरातल्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयाकडून पैशांची लूट होत असल्याचा आरोप करत अरबाजने चाहत्यांकडे मदतीची विनंती केली होती.

अरबाजची पोस्ट-

“इथे एवढी लूट होतेय, माझ्या बापाला मला मरताना पहायचं नाहीये. म्हणून त्यांना मला या रुग्णालयातून दुसरीकडे शिफ्ट करावं लागतंय. इथला माझा अनुभव खूपच वाईट आहे. जाणकरांनी मला सांगावं की माझ्या वडिलांना उपचारासाठी कुठे दाखल करावं? मला आता काहीच कळत नाहीये, पण माझ्या बापाला मला काहीही करून वाचवायचं आहे. मला प्लीज मदत करा,” अशी विनंती अरबाजने व्हिडीओमार्फत केली होती. हा व्हिडीओ जेव्हा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचला, तेव्हा त्यांनी थेट संबंधित रुग्णालयाच्या मेडिकलवर कारवाईचे आदेश दिले होते.

अरबाज ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने या चित्रपटात परश्याचा मित्र सल्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘झुंड’, ‘बस्ता’, ‘पिक्चर बॉइज’, ‘मुसंडी’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं. नागराज मंजुळे यांच्याच ‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्येही तो झळकला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us