
अभिनेता सलमान खानच्या घरी दरवर्षी धूमधूडाक्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. सलमानची बहीण अर्पिता खानच्या घरात बाप्पाचं आगमन झालं होतं. यंदाही गणेश चतुर्थीदिनी संपूर्ण खान परिवार गणरायाच्या पूजेत मग्न दिसलं. बुधवारी संध्याकाळी झालेल्या आरतीत सलमान, त्याचे आई-वडील आणि भावंडं एकत्र आले होते. सर्वांनी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली आणि गुरुवारी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन केलं. या विसर्जन मिरवणुकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ढोल-ताशाच्या गजरावर सलमानने त्याच्या कुटुंबीयांसोबत ठेका धरला. भाचा आहिलसोबत तो धमाल-मस्ती करतानाही दिसला. या व्हिडीओमध्ये सलमानसोबत त्याचा भावोजी आयुष, भाची आयत आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, झहीर खान, अर्पिता खान दिसले.
सलमानचे दोन्ही पुतणे अरहान आणि निर्वाण खानसुद्धा यावेळी नाचत होते. तर सलमानने भाचीसोबत डान्स केला. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या पतीसोबत या विसर्जन मिरवणुकीत पोहोचली होती. सोनाक्षी आणि तिचा पती झहीर इक्बालनेही मिरवणुकीत डान्स केला. सलमान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांना अशाप्रकारे एकत्र आणि आनंदी पाहून चाहतेसुद्धा खुश झाले. गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर सलमान राजकीय नेते राहुल कनल यांच्या घरी पोहोचला आणि तिथे गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी सलमानसोबत झेड प्लस सुरक्षा होती.
बुधवारी अर्पिताच्या घरातील आरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी सलमान खान, त्याची आई सलमा आणि वडील सलिम खान, अरबाज खान, सोहैल खान या सर्वांनी मनोभावे गणरायाची आरती केली. खान कुटुंबीय एकत्र येऊन दरवर्षी गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतात.
अर्पिता खानशिवाय गुरुवारी अभिनेता गोविंदा आणि सुनिता अहुजा यांच्या घरातील गणरायाचंही विसर्जन करण्यात आलं. त्याचसोबत अभिनेत्री अनन्या पांडे आणि मिका सिंग यांनीसुद्धा त्यांच्या घरातील गणपती बाप्पाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेशभक्तांनी गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात बुधवारी घरोघरी तसंच सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पाचं आगमन झालं.