‘अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे’; मुंबई पोलिसांसाठी सलमानचं खास ट्विट

| Updated on: Nov 04, 2022 | 6:45 PM

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; सलमान खाननेही केलं कौतुक

अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे; मुंबई पोलिसांसाठी सलमानचं खास ट्विट
Salman Khan
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई- अभिनेता सलमान खानने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. अपहरण झालेल्या एक वर्षाच्या बालकाची सुटका मुंबई पोलिसांनी केली. यामुळेच सलमानने त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. लहान मुलांचं अपहरण हा सर्वांत मोठा गुन्हा असल्याचं ‘दबंग’ खानने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांनी मिळून एक वर्षाच्या मुलाचं अपहरण केलं होतं.

मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग करत सलमानने ट्विट केलं, ‘मुंबई पोलिसांचं देव भलं करो. तुम्हाला खूप शक्ती मिळो अशी मी प्रार्थना करतो, दुआँ मागतो. मानवाकडून केला जाणारा सर्वांत मोठा गुन्हा म्हणजे लहान मुलांची तस्करी. या गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रार्थना करा की सर्व मुलं सापडू दे आणि त्यांच्या पालकांकडे परत जाऊ दे.’

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण?

मुंबई पोलिसांनी गुरुवारी ट्विट करत या घटनेची माहिती दिली होती. ‘एक वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी क्राइम ब्रांचच्या युनिट 9 ने आरपीएफ सोलापूर विभागाच्या साहाय्याने दोन आरोपींना अटक केली आहे’, असं ट्विट पोलिसांनी केलं. आरोपी लपण्यासाठी सोलापूरला पळाले होते, असंही त्यात म्हटलं गेलंय. मात्र त्यांचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली. अपहरण झालेल्या संबंधित मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी मुलाला आईकडे सोपवतानाचे काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

या ट्विटवर कमेंट करत नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक केलं आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या ट्विटवरही पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कौतुकासाठी धन्यवाद’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.