Salman Khan: महिला स्वत: त्यांना पैसे देऊन आक्षेपार्ह फोटो काढायला सांगतात; सलमान खान संतापला
सेलिब्रिटींचे फोटो काढणं हा पापाराझींच्या कामाचा भाग असला, तरी त्यासाठी कोणाच्या वैयक्तिक मर्यादांचं उल्लंघन करणं योग्य ठरत नाही, असं सलमान खानने स्पष्ट केलं. यापुढे कठोर भूमिका घेणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. आता सलमान खानने अभिनेत्रींचे संमतीशिवाय काढले जाणारे आक्षेपार्ह फोटो आणि पापाराझींच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘बिग बॉस 20’च्या मंचावर यापूर्वीही हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या सलमानने आता या प्रकारांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, काही महिला आणि पुरुष स्वतःच पापाराझींना बोलावून अशा प्रकारचे फोटो काढण्यासाठी पैसे देतात, असा दावाही त्याने केला आहे. ‘बिग बॉस 20’मध्ये पाहुणी म्हणून आलेल्या नेहा धुपियाने सलमानने हा विषय मांडल्याबद्दल त्याचे आभार मानले. अभिनेत्रींच्या संमतीशिवाय त्यांचे मागून काढले जाणारे फोटो आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता हा मुद्दा तिनेही यापूर्वी उपस्थित केला होता.
या विषयावर बोलताना सलमान म्हणाला, काही महिला आणि पुरुष स्वतः पापाराझींना बोलावतात, त्यांना पैसे देतात आणि विशिष्ट प्रकारचे फोटो काढण्यास सांगतात. मग तेही काय करणार? त्यामुळे काही जणांना असे फोटो हवे असले, तरी प्रत्येकालाच ते आवडतात असं नाही. ज्यांना अशा फोटोंची हरकत नाही, त्यांचे फोटो काढले जातात; मात्र ज्यांना ते नको आहेत, त्यांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे, असं सलमानने स्पष्ट केलं. एखाद्या अभिनेत्रीने स्पष्टपणे असे फोटो काढण्यास नकार दिल्यानंतरही तिचे फोटो काढले जात असतील, तर ते अजिबात स्वीकारार्ह नाहीत, अशी भूमिका त्याने मांडली.
‘आधीच इशारा दिला, तरीही प्रकार वाढले’
सलमान खानने यापूर्वीही ‘बिग बॉस 20’च्या मंचावर पापाराझींच्या या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. गाडीतून उतरताना किंवा गाडीत बसताना अभिनेत्रींच्या शरीराच्या विशिष्ट भागांवर लक्ष केंद्रित करून फोटो काढले जात असल्याचं त्याने सांगितलं होतं. अभिनेत्री सई मांजरेकर अशा फोटोंमुळे अस्वस्थ झाल्याचं त्याने नमूद केलं होतं. तसंच स्वतःच्या भाचीचेही मागून फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचा अनुभव त्याने सांगितला होता. नेहा धुपियानेही अशा प्रकारांना विरोध केल्याचा उल्लेख सलमानने केला होता.
आता पुन्हा या विषयावर बोलताना सलमानने सांगितलं की, याआधी आक्षेप नोंदवूनही काही पापाराझींनी हे प्रकार थांबवलेले नाहीत. उलट, त्यात वाढ झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आहे. काही मोठे प्लॅटफॉर्मही अशा प्रकारांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्याने केला. त्यामुळे यापुढे या प्रकरणावर ठोस भूमिका घेणार असल्याचं सांगत त्याने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सलमानने मनोरंजनविश्वातील या महत्त्वाच्या विषयावर मोठ्या मंचावर आवाज उठवल्याबद्दल नेहा धुपियाने त्याचे आभार मानले.