Sanjay Dutt : 7 अफेअर, पहिल्या पत्नीचं निधन, दुसरा घटस्फोट अन् 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लग्न; वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होता प्रसिद्ध अभिनेता
Bollywood Actor Controversial Life : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असायचा. जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा केवळ आपल्या चित्रपटांमुळेच नाही, तर त्याच्या वादग्रस्त वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिला आहे. त्याच्या आयुष्यात अनेक प्रेमसंबंध आले. विशेष म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षितसोबतच्या कथित अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती. आता ‘साजन’ चित्रपटाचे दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी या चर्चेला पुन्हा एकदा उजाळा दिला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत लॉरेन्स यांना संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरबद्दल विचारण्यात आलं. मात्र, त्यांनी यावर थेट भाष्य करणं टाळलं. त्याऐवजी त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, संजय अनेकदा सेटवर येऊन माधुरीचे क्लोजअप शॉट्स पाहत असे. लॉरेन्स स्वतः दिग्दर्शनासोबत कॅमेराही हाताळत असल्यामुळे संजय मॉनिटरमधून माधुरीला पाहत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. मात्र, त्या दोघांमध्ये खरंच प्रेमसंबंध होते का, याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
संजय दत्तच्या आयुष्यात आल्या अनेक अभिनेत्री
संजय दत्तच्या प्रेमप्रकरणांची चर्चा त्याच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच सुरू होती. त्याचं पहिलं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री टीना मुनीम यांच्यासोबत. ‘रॉकी’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. काही काळ हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, पुढे त्यांचे मार्ग वेगळे झाले. यानंतर संजय दत्तचं नाव अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि किमी काटकर यांच्यासोबतही जोडलं गेलं. अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही संजयच्या नावाची चर्चा झाली होती. ‘जमीन आसमान’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या चर्चांना अफवा म्हणूनही पाहिलं गेलं.
रिचा शर्मासोबत केलं पहिलं लग्न
संजय दत्तने 1987 मध्ये अभिनेत्री रिचा शर्मा हिच्यासोबत लग्न केलं. 1988 मध्ये त्यांना त्रिशाला नावाची मुलगी झाली. मात्र, रिचाला ब्रेन ट्यूमरचं निदान झालं आणि उपचारांसाठी ती अमेरिकेत गेली. 1996 मध्ये तिचं निधन झालं. या काळात संजय आणि माधुरी यांच्या कथित अफेअरच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या. माधुरी आणि संजय यांनी ‘खतरों के खिलाडी’, ‘थानेदार’, ‘साजन’ आणि ‘खलनायक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, दोघांनीही कधीही आपल्या प्रेमसंबंधांची अधिकृत कबुली दिली नाही. 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजयला अटक झाल्यानंतर माधुरीने त्याच्यापासून अंतर ठेवलं.
View this post on Instagram
रिचा शर्माच्या निधनानंतर संजय दत्तच्या आयुष्यात मॉडेल आणि अभिनेत्री रिया पिल्लई आली. दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं. मात्र, त्यांचं वैवाहिक आयुष्य फार काळ टिकलं नाही. पुढे दोघे विभक्त झाले. याशिवाय संजय दत्तचं नाव अभिनेत्री लिसा रे हिच्यासोबतही जोडलं गेलं होतं. नादिया दुर्रानीसोबतच्या त्याच्या कथित प्रेमसंबंधांचीही त्यावेळी चर्चा झाली.
मान्यता दत्तसोबत थाटला संसार
अखेर संजय दत्तच्या आयुष्यात मान्यता दत्तची एन्ट्री झाली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 7 फेब्रुवारी 2008 रोजी लग्न केलं. 2010 मध्ये या जोडप्याच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला. आज संजय आणि मान्यता आपल्या संसारात आनंदी आहे.
अनेक वर्ष ड्रग्सचं व्यसन
संजय दत्तने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कॉलेजमध्ये असताना त्याने पहिल्यांदा ड्रग्स घेतलं. त्यावेळी मित्रांमध्ये ड्रग्स घेणं हा एक प्रकारचा ट्रेंड असल्याचं त्याला वाटत होतं. आपणही कूल दिसावं, मुलींचं लक्ष वेधलं जावं, या विचारातून त्याने ड्रग्स घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, सुरुवातीला केवळ प्रयोग म्हणून सुरू झालेली ही सवय पुढे व्यसनात बदलली. संजयच्या म्हणण्यानुसार, त्याने हेरॉइन, कोकेन यांसह विविध प्रकारच्या ड्रग्सचा अनुभव घेतला होता. या व्यसनामुळे त्याच्या आयुष्यातील अनेक वर्षे वाया गेली. संजय दत्तला ड्रग्सच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी बराच काळ संघर्ष करावा लागला. त्याची बहीण प्रिया दत्तनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, संजयला व्यसनातून बाहेर पडण्यासाठी जवळपास तीन ते साडेतीन वर्षे लागली. जर्मनी आणि भारतातील काही पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचार घेतल्यानंतर त्याला अमेरिकेत पाठवण्यात आलं होतं. तिथं त्यानं काही महिने उपचार घेतले.
