लग्नाच्या 2 दिवसांनंतर समंथाने पती राजसाठी लिहिली अशी पोस्ट; भानगड काय?

लग्नाच्या दोन दिवसांनंतर समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिलेल्या एका कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. राज निदिमोरूसोबतच्या लग्नातील फोटो तिने शेअर केला आहे आणि त्यावर तिने हे कॅप्शन लिहिलं आहे.

लग्नाच्या 2 दिवसांनंतर समंथाने पती राजसाठी लिहिली अशी पोस्ट; भानगड काय?
Samantha and Raj Nidimoru
Image Credit source: Instagram
Updated on: Dec 04, 2025 | 10:19 AM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज निदिमोरूशी 1 डिसेंबर रोजी लग्न केलं. कोईंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनमधील लिंग भैरवी मंदिरात त्यांचं लग्न पार पडलं. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. समंथा आणि राजचं हे दुसरं लग्न आहे. समंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर इन्स्टा स्टोरीमध्ये ती विविध फोटो आणि पोस्ट शेअर करत आहे. तिच्या अशाच एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. लग्नाच्या दोन दिवसांनंतर समंथाने आता स्वत:ला राजची ‘प्रॉब्लेम’ (समस्या) असल्याचं म्हटलंय.

समंथाच्या लग्नाला काही तिच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीसुद्धा उपस्थित होत्या. या मैत्रिणींनीही तिच्या लग्नातील खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अशाच एका मैत्रिणीची पोस्ट समंथाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केली आहे. यामध्ये ती राजसमोर वरमाळा घेऊन उभी असल्याचं पहायला मिळतंय. तिच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळतोय. हा फोटो शेअर करत समंथाने लिहिलं, ‘तो क्षण जेव्हा मला जाणवलं की आता मी त्याची प्रॉब्लेम बनली आहे.’

समंथाची पोस्ट-

समंथाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या लग्नातील तिचा लूकसुद्धा चाहत्यांना खूप आवडला आहे. समंथाने लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. त्यावर पारंपरिक दागिने, अत्यंत साधी पण तितकीच आकर्षक हेअरस्टाइल आणि साजेसा मेकअप असा तिचा लूक होता. तर राज निदिमोरूने कुर्ता पायजमा परिधान केला होता. या दोघांच्या जोडीवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. नाग चैतन्यशी घटस्फोट आणि त्यानंतर मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान यांमुळे समंथाविषयी चाहत्यांच्या मनात सहानुभूती होतीच. त्यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.

समंथाने 2017 मध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. तर राज निदिमोरूने सहाय्यक दिग्दर्शिका श्यामली डे हिच्याशी पहिलं लग्न केलं होतं. 2022 मध्ये राज आणि श्यामली यांचाही घटस्फोट झाला. समंथा आणि राज यांनी ‘द फॅमिली मॅन 2’ आणि ‘सिटाडेल: हनी बनी’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केलंय.