दादरलाच आहात मग घरी येऊन जा..; राज ठाकरेंचा समीर चौघुलेंना अनपेक्षित फोन अन्..

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुले यांना राज ठाकरेंचा अनपेक्षित फोन आला आणि त्यानंतर ते 'शिवतीर्थ'वर त्यांची भेट घेण्यासाठी गेले. या भेटीचा फोटो पोस्ट करत समीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दादरलाच आहात मग घरी येऊन जा..; राज ठाकरेंचा समीर चौघुलेंना अनपेक्षित फोन अन्..
Samir Choughule, Raj Thackeray
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2026 | 12:26 PM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले अभिनेते समीर चौघुले रंगभूमीवरही सक्रिय आहेत. त्यांच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाचे नुकतेच 100 प्रयोग पूर्ण झाले. सामान्य मध्यमवर्गीय माणसाचं प्रेम ते लग्न या प्रवासावर भाष्य करणारा हा एकपात्री कार्यक्रम आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे एक लेखक म्हणून, अभिनेता म्हणून आणि गायक म्हणून समीर यांची प्रतिभा अवघ्या मराठी विश्वाला ठाऊक झाली आहे. मग यात कलासक्त नेते म्हणून ओळखले जाणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे तरी कसे मागे राहतील? राज ठाकरे यांनी नुकतात त्यांना फोन करून घरी भेटायला बोलावलं होतं. या भेटीचा फोटो पोस्ट करत समीर यांनी अनुभव सांगितला आहे.

समीर चौघुलेंची पोस्ट-

‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या माझ्या एकपात्री कार्यक्रमाचे 100 प्रयोग झाल्याबद्दल अभिनंदनाचे अनेक फोन आले. पण एक कॉल खूपच अनपेक्षित आणि खास होता. तो होता अत्यंत दिलखुलास, दर्दी, कलासक्त नेते माननीय राजसाहेब ठाकरे यांचा. “दादरलाच आहात मग घरी येऊन जा”.. आणि मग झाली एका राजामाणसाबरोबर एक सहजसुंदर भेट, भरपूर गप्पा आणि हास्यजत्रेवरील प्रेम.. आणि हो मी निघताना 100 प्रयोग झाल्याबद्दल मला आणि माझ्या सहचारिणीला दिलेली सुंदर भेटवस्तू. मनापासून आभार साहेब,’ अशा शब्दांत त्यांनी अनुभव सांगितला. समीर यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. राज ठाकरेंनी कौतुकाची थाप दिली तर सगळंच जिंकलं, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

समीर चौघुले यांच्या ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या एकपात्री कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. हास्यजत्रेत पंधरा-वीस मिनिटांचं स्किट सादर करणारे समीर या एकपात्री कार्यक्रमातून जवळपास अडीच तास एकटेच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. विशेष म्हणजे कोणत्याही दुहेरी अर्थाचे संवाद, अंगविक्षेप, कमरेखालचे विनोद न करता ते प्रेक्षकांना पोट धरून हसवतात. प्रयोग सुरू झाल्यापासून संपेपर्यंत हशा, टाळ्या आणि जल्लोष यांमुळे माहोल बनल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

Follow Us