‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरची नवी मालिका; कोण आहे हिरो?

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी केळकर एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'हळद रुसली कुंकू हसलं' असं या मालिकेचं नाव आहे. यामध्ये 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतील अभिनेता मुख्य भूमिका साकारत आहे.

फुलाला सुगंध मातीचा फेम समृद्धी केळकरची नवी मालिका; कोण आहे हिरो?
Samruddhi Kelkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 09, 2025 | 8:46 AM

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘हळद रुसली कुंकू हसलं’. शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा आणि खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असलेला दुष्यंत अशी अत्यंत विजोड असलेली जोडी अपघाताने एकत्र येते. हा अपघात नव्या नात्याची सुरुवात असेल की अखेरची भेट याची अतिशय उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका. सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर आणि लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकर ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या समृद्धी केळकरला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. तिने साकारलेली करारी आणि आत्मविश्वासू कीर्ती ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना विशेष भावली. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत ती साकारत असलेली कृष्णा ही व्यक्तिरेखा थोडी वेगळी आहे. प्रचंड स्वाभिमानी आणि कष्टाळू असलेल्या कृष्णाचं आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम आहे. लहान वयात संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यामुळे तिला परिस्थितीची जाणीव आहे. सुखाचे दिवस नक्की येतील असा विचार करणारी आणि त्यासाठी काबाडकष्ट करण्याची कृष्णाची तयारी आहे. कृष्णा लौकिक अर्थाने शिकू शकली नाही. पण तिचं शेतीचं ज्ञान वाखाणण्यासारखं आहे. गाई-गुरांवर तिचं मनापसून प्रेम आहे. त्यांची आजारपणे, त्यावरची झाडपाल्याची औषधे याची तिला उत्तम माहिती आहे. सगळं आयुष्य शेतात राबण्यात गेलं म्हणून असेल पण स्वयंपाक घरात ती कधीच रमली नाही.

समृद्धी केळकर कृष्णा या पात्राविषयी सांगताना म्हणाली, “टेलिव्हिजन हे माझं सर्वात आवडतं माध्यम आहे. मला असं वाटतं की या माध्यमाद्वारे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहaचून मनोरंजन करु शकतो. दोन अडीच वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकाविश्वात येताना अतिशय आनंद होतोय. चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि या रोलसाठी विचारणा झाली. या भूमिकेविषयी ऐकताच ती मला क्षणात भावली.”

“कृष्णाच्या निमित्ताने खूप गोष्टी नव्याने शिकता येणार आहेत. फुलाला सुगंध मातीचा मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. कीर्ती खूप शिकलेली, स्वत:च्या मतावर ठाम आणि सर्वांना सांभाळून घेणारी होती. कृष्णा थोडी वेगळी आहे. कोल्हापुरच्या मातीत ती वाढली आहे. शिकलेली नसली तरी शेतीचं ज्ञान अवगत असणारी. या मालिकेत माझा लूकपण पूर्णपणे वेगळा आहे. नो मेकअप लूक आहे असं म्हण्टलं तरी चालेल. शेतात राबणारी कृष्णा साकारत असल्यामुळे जाणीवपूर्वक मेकअप टाळतेय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची गोष्ट कोल्हापुरातली आहे त्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा शिकतेय. प्रेक्षकांना हे नवं पात्र आणि नवी मालिका नक्की आवडेल याची खात्री आहे,” अशा विश्वास तिने व्यक्त केला.

‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेनंतर अभिनेता अभिषेक रहाळकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत तो दुष्यंत हे पात्र साकारणार आहे. एकीकडे शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा आणि दुसरीकडे खेड्याविषयी कमालीचा तिटकारा असलेला दुष्यंत. सर्वात श्रीमंत कुटुंब रांगडे पाटील यांचा एकुलता एक वारस. घरची प्रचंड शेती आणि इतर व्यवसाय असले तरी त्याला खेड्याचा तिटकारा आहे.

अभिनेता अभिषेक रहाळकर नव्या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो आपल्या लूकवर मेहनत घेतोय. “मी स्वत:ला खूप नशिबवान समजतो की चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांबरोबर करण्याची मला संधी मिळत आलीय. या मालिकेच्या बाबतीतही असंच म्हणावसं वाटेल. दुष्यंत हे पात्र याआधीच्या साकारलेल्या पात्रापेक्षा वेगळं आहे. प्रेक्षकांनी नव्या रुपात स्वीकारावं हीच इच्छा व्यक्त करेन,” अशी भावना अभिषेक रहाळकरने व्यक्त केली.