लाइव्ह शोमध्ये शोएब मलिकला तिसऱ्या पत्नीने म्हटलं ‘बदतमीज’; ट्रोल्स म्हणाले ‘सानिया मिर्झा असती तर..’

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि त्याची तिसरी पत्नी सना जावेद हे नुकत्याच एका शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते. या शोमध्ये सना शोएबला सर्वांसमोर उद्धट असं म्हणते. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

लाइव्ह शोमध्ये शोएब मलिकला तिसऱ्या पत्नीने म्हटलं बदतमीज; ट्रोल्स म्हणाले सानिया मिर्झा असती तर..
Shoaib Malik and Sana Javed
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2025 | 3:08 PM

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक हे गेल्या वर्षी विभक्त झाले. त्यानंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला. शोएबचा हा तिसरा तर सना जावेदचा हा दुसरा निकाह होता. यानंतर सोशल मीडियावर भारतीयांकडून शोएबवर खूप टीका झाली होती. शोएब आणि सना नुकत्याच एका पाकिस्तानी गेम शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते. ‘जीतो पाकिस्तान लीग’ असं या शोचं नाव होतं. या शोमध्ये दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि काही गेम्ससुद्धा खेळले. परंतु एका गेमदरम्यान सना जावेद ही पती शोएब मलिकला ‘उद्धट’ असं म्हणते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. नॅशनल टेलिव्हिजनवर पतीला अशाप्रकारे उद्धट बोलल्यामुळे सनाला नेटकरी ट्रोल करत आहेत.

या गेमदरम्यान सना आणि शोएबला बॉक्स निवडायचे होते. या बॉक्सच्या मागे काही नंबर्स लिहिलेले होते. सनाने जो बॉक्स निवडला होता, तो पाहून शोएबने अंदाज लावला की त्याच्यामागे कोणताच नंबर नसेल. त्यावरून सना शोएबला ‘बदतमीज’ म्हणजेच उद्धट असं म्हणते. सूत्रसंचालकाशी बोलताना सना म्हणते, “तो उद्धट म्हणतोय की काहीच नंबर नाही.” यानंतर सूत्रसंचालक जेव्हा सनाच्या हातातील बॉक्स उघडतो, तेव्हा त्यात खरंच कोणताच नंबर नसतो. त्यावर शून्य लिहिलेलं असतं. तेव्हा सूत्रसंचालक शोएबचं कौतुक करतो.

या गेमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सनावर टीका केली आहे. हिला पतीसोबत बोलण्याची पद्धतच नाही, असं एकाने म्हटलंय. तर हिरा गमावून शोएब मलिकने कोळसा मिळवलाय, अशी टीका दुसऱ्या युजरने केली. वाह वाह.. पतीला नॅशनल टीव्हीवर उद्धट म्हणतेय, सानिया मिर्झाने असं कधीचं केलं नसतं, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी आहे. याआधी त्याने आयेशा सिद्दिकीशी पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर सानिया मिर्झाशी त्याने दुसरं लग्न केलं. सानियाने खुला दिल्यानंतर शोएबने सनाशी तिसऱ्यांदा लग्न केलं. एका रिअॅलिटी शोदरम्यान शोएब आणि सनाची पहिल्यांदा भेट झाली होती. तिथूनच हळूहळू त्याच्या विवाहबाह्य संबंधाला सुरुवात झाली होती.