
“छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने खंड स्वरुपात प्रसिद्ध करावा. त्यामुळे होणारे सारखे वादविवाद संपुष्टात येतील. कोणाला सिनेमा काढायचा असेल, सीरियल बनवायची असेल, सिनमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा आला पाहिजे” अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. “कुठलीतरी कांदबरी काल्पनिक स्वरुपात लिहितात, अशी अनेक कुटुंब, घराणी या महाराष्ट्रात, देशात आहेत, ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलय. काल्पनिक आधारावर जेव्हा तुम्ही चित्रपट रिलीज करता, हे करण्याआधी इतिहासकांची एक कमिटी बनवा” अशी मागणी उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
“चित्रपटाच स्क्रिप्ट त्या समितीसमोर गेलं पाहिजे. ती समिती अभ्यास करेल. काल्पनिक आधारावर जे होतं, त्यातून तेढ निर्माण होते. संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते. छावा चित्रपटात दाखवलय शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलय. पण अशी इतिहासात कुठेही नोंद नाही. तसं असतं तर सोयरिक झाली असती का?” असं उदयनराजे म्हणाले.
‘त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो’
“ते म्हणत होते की, आज आम्ही कुठेही गेलो तरी लोक त्या नजरेने बघतात. आज लोक वेगवेगळ्या व्यवसायात, प्रोफेशनमध्ये असतील प्रत्येकावर गदा येते. त्यांच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन निर्माण होतो. समाजात तेढ निर्माण करण्याच काम हे जे लोक करतात, त्यासाठी याच अधिवेशनात कायदा आणा” अशी मागणी उदयनराजे यांनी केली. “मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता सर्वपक्षीय नेते यांनी याच अधिवेशनात कायदा पारित करुन दाखवावा. अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल” असं उदयनराजे म्हणाले.
‘कायदा करुन शिकार करा’
“दंगली होतात, कारण नसताना लोक मृत्यूमुखी पडतात, हे थांबवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचच नाही, महाराष्ट्रातील सगळ्यांचच आहे. महाराष्ट्रात चालू अधिवेशनात विशेष कायदा पास करावा ही माझी विनंती आहे. असं केलं नाही, तर सारखा गोंधळ सुरु राहिलं. सभागृहातील शोर आता बंद करा आणि कायदा करुन शिकार करा” असं उदयनराजे म्हणाले.