‘गोपी बहू’ने ऑनस्कीन दीराशी केलं लग्न; ‘भूत शुद्धी विवाहपद्धती’ म्हणजे काय?

गोपी बहूची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया मानेकने भूत शुद्धी पद्धतीने प्रियकर वरुण जैनशी लग्न केलं. जियाच्या पोस्टमध्ये 'भूत शुद्ध विवाह'चा हॅशटॅग वाचून अनेकांना त्याविषयी प्रश्न पडला आहे.

गोपी बहूने ऑनस्कीन दीराशी केलं लग्न; भूत शुद्धी विवाहपद्धती म्हणजे काय?
जिया मानेक आणि वरुण जैन
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2025 | 8:22 PM

‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेतील गोपी बहू तुम्हाला आठवतेय का? त्याच गोपी बहूने आता खऱ्या आयुष्यात लग्न केलंय, तेसुद्धा तिच्या खास मित्रासोबत. 21 ऑगस्ट रोजी अभिनेत्री जिया मानेक आणि वरुण जैन यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना लग्नाची खुशखबर दिली. जिया आणि वरुण यांनी त्यांचं रिलेशनशिप माध्यमांपासून दूर ठेवलं होतं. आता मोजक्या पाहुण्यांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत छोटेखानी समारंभात त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत त्यांनी लग्न जाहीर केलं.

या फोटोंसोबत जियाने लिहिलं, ‘देव आणि गुरूंच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने आम्ही कायमचे एक झालो आहोत. हातात हात घालून, हृदयाशी हृदयाचं मिलन झालंय. आम्ही दोघं खूप चांगले मित्र होतो, आज पती-पत्नी झालो आहोत. हा दिवस इतका खास बनवणाऱ्या सर्व प्रियजनांच्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी खूप आभारी आहे. मिस्टर आणि मिसेस जिया आणि वरुण म्हणून कायम हसत, आठवणी साठवत, एकत्र राहण्यासाठी चिअर्स!’

या लग्नात जियाने गोल्डन सिल्क साडी नेसली होती. त्यावर भरजरी दागिने, केसात गजरे.. अशा दाक्षिणात्य वधूच्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर वरुणने चमकदार पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. लग्नाच्या या फोटोंमध्ये दोघांचं प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या दोघांनी भूत शुद्धी पद्धतीने लग्न केलंय. जियाने तिच्या पोस्टच्या हॅशटॅगमध्ये याचा उल्लेख केला आहे. ते पाहून भूत शुद्धी विवाहपद्धती म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

भूत शुद्धी विवाह म्हणजे काय?

भूत शुद्धी विवाह हा सदगुरू म्हणजेच अध्यात्मिक गुरू जग्गी वासूदेव यांच्या ईशा फाऊंडेशनने सादर केलेला योगिक पद्धतीवर आधारित विवाह विधी आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भूत शुद्धी म्हणजे मानवी शरीराच्या पाच घटकांचे (पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी आणि आकाश) शुद्धीकरण. भूत शुद्धी विवाहामुळे जोडप्याला मूलभूत पातळीवर मजबूत बंधन निर्माण करण्याची संधी प्रदान करतो. या पवित्र समारंभात, जोडपं अग्निभोवती फेरे घेतात.

‘साथ निभाना साथियाँ’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून जिया मानेक घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने ‘जिनी और जुजू’मध्ये जिनीची भूमिका साकारून सर्वांची मनं जिंकली. जिया आणि वरुण यांनी ‘तेरा मेरा साथ रहे’च्या रीबूटमध्ये एकत्र काम केलं होतं. याच शोच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.