Satish Kaushik | सतीश कौशिक यांना ‘मिस्टर इंडिया’मध्ये ‘कॅलेंडर’ नाव कसं मिळालं? वाचा रंजक किस्सा

| Updated on: Mar 09, 2023 | 10:00 AM

सतीश कौशिक यांच्या भूमिकेला तसा फारसा स्कोप नव्हता. मात्र एका छोट्या नोकराच्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. त्यांच्या भूमिकेला कॅलेंडर नाव कसं मिळालं, याचाही रंजक किस्सा आहे.

Satish Kaushik | सतीश कौशिक यांना मिस्टर इंडियामध्ये कॅलेंडर नाव कसं मिळालं? वाचा रंजक किस्सा
Satish Kaushik
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूडमधील हसतं – खेळतं व्यक्तिमत्त्व, अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्ली एनसीआरमध्ये त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले. सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत निधनाची माहिती दिली आणि दु:ख व्यक्त केलं. सतीश यांनी त्यांच्या कारकिर्दीत जवळपास 100 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्यांची सर्वाधिक गाजलेली भूमिका म्हणजे ‘मिस्टर इंडिया’मधील कॅलेंडरची. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

कशी मिळाली कॅलेंडरची भूमिका?

जेव्हा मिस्टर इंडिया हा चित्रपट बनत होता, तेव्हा सतीश कौशिक हे त्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. त्याचवेळी ते या चित्रपटासाठी ऑडिशनसुद्धा घेत होते. मात्र सतीश यांच्या डोक्यात वेगळीच कल्पना होती. त्यांना या चित्रपटात अभिनय करायची इच्छा होती. ते कोणत्याही भूमिकेसाठी तयार होते. त्यामुळे जेव्हा त्यांना समजलं की चित्रपटात नोकराची भूमिकासुद्धा आहे, तेव्हा काहीही करून ती भूमिका मिळवायची, असा विचार त्यांनी केला. जे लोक त्या भूमिकेच्या ऑडिशनसाठी यायचेस त्यांना ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नकार द्यायचे. अखेर त्यांनी स्वत: भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांच्या आयुष्यातील ही अविस्मरणीय भूमिका ठरली.

शेखर कपूर यांच्या या चित्रपटात अनिल कपूर, श्रीदेवी, अनु कपूर यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाची कास्ट मोठी होती. अशोक कुमार, अमरिश पुरी हे कलाकारसुद्धा त्यात होते. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या भूमिकेला तसा फारसा स्कोप नव्हता. मात्र एका छोट्या नोकराच्या भूमिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. त्यांच्या भूमिकेला कॅलेंडर नाव कसं मिळालं, याचाही रंजक किस्सा आहे.

हे सुद्धा वाचा

भूमिकेला कॅलेंडर नाव कसं मिळालं?

सतीश कौशिक जेव्हा लहान होते, तेव्हा त्यांच्या वडिलांना भेटायला एक व्यक्ती यायची. त्या व्यक्तीच्या तोंडी नेहमीच कॅलेंडर हा शब्द असायचा. प्रत्येक वाक्यात ते कॅलेंडर या शब्दाचा वापर करायचे. हीच गोष्ट सतीश कौशिक यांना आठवली आणि त्यांनी स्वत:च्याच भूमिकेचं नाव कॅलेंडर असं ठेवलं. ‘मेरा नाम है कॅलेंडर, मै चला किचन के अंदर’ असा चित्रपटात त्यांचा भन्नाट डायलॉगसुद्धा आहे.