बॉयकॉटच्या मागणीदरम्यान शाहरुखच्या चित्रपटाचं नवीन गाणं ठरतंय हिट; ‘झुमे जो पठान’ सोशल मीडियावर ट्रेंड

Pathaan: 'झुमे जो पठान' गाणं व्हायरल; 30 मिनिटांत 1 दशलक्ष व्ह्यूज, शाहरुखचे चाहते म्हणाले "आता कसं करणार बॉयकॉट?"

बॉयकॉटच्या मागणीदरम्यान शाहरुखच्या चित्रपटाचं नवीन गाणं ठरतंय हिट;  झुमे जो पठान सोशल मीडियावर ट्रेंड
'पठाण'मधील नवीन गाणं सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
Image Credit source: Twitter
| Updated on: Dec 22, 2022 | 2:40 PM

मुंबई: चार वर्षांनंतर कमबॅक, त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आणि तितकाच मोठा वाद.. असं बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खानच करू शकतो. शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘झुमे जो पठान’ असं या गाण्याचं नाव आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधीत हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं. युट्यूबवर अवघ्या 30 मिनिटांत या गाण्याला एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बेशर्म रंग’ या पहिल्या गाण्यावरून वाद झाला तरी युट्यूबवर त्याला तगडे व्ह्यूज मिळाले होते.

‘पठाण’च्या या नव्या गाण्यातही शाहरुख आणि दीपिकाचा अत्यंत ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतोय. हटके कपडे, सुंदर लोकेशन्स, कूल लूक आणि त्यावर परफेक्ट डान्स.. असं सगळंच या गाण्यात जुळून आलंय. दीपिकाने तिच्या स्टायलिश लूकने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तीच बॉलिवूडची ‘दिवा’ आहे.

या गाण्यात पुन्हा एकदा शाहरुख शर्टलेस झाला आणि त्याने स्वत:ची सिग्नेचर पोझ दिली. 57 व्या वर्षी शाहरुखची फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. त्याचे सिक्स पॅक ॲब्स यात स्पष्ट दिसत आहेत. ट्विटरवर हे गाणं त्यातील दृश्ये ट्रेंड होऊ लागली आहेत.

‘झुमे जो पठान’ हे गाणं प्रदर्शित होताच शाहरुखच्या चाहत्यांनी ट्रोलर्सची शाळा घेतली. ‘बॉयकॉट गँगवाल्यांनी आता हे सांगावं की या गाण्यात बॉयकॉट करण्यासारखं काय आहे’, असा सवाल एकाने केला. तर ’10 वेळा हे गाणं बघूनही काहीच आक्षेपार्ह मिळालं नाही, माझी मदत करा’, असा उपरोधित टोला दुसऱ्या युजरने लगावला.

पठाणमध्ये शाहरुख, दीपिकासोबतच जॉन अब्राहमचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.