
बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानचं त्याच्या तिन्ही मुलांसोबत खूप चांगलं नातं आहे. जेव्हा आर्यन खानचं नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आलं होतं, तेव्हा शाहरुख त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला होता. तर दुसरीकडे जेव्हा एका आयपीएल मॅचदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुलगी सुहानासोबत उद्धटपणा केला गेला, तेव्हासुद्धा शाहरुख लेकीसाठी समोर धावून आला होता. इतकंच नव्हे तर सर्वांत छोटा मुलगा अबराम जन्मानंतर जेव्हा आरोग्याच्या समस्यांना सामोरं जात होता, तेव्हासुद्धा शाहरुख सतत रुग्णालयात फेऱ्या मारायचा.
दोन मुलांचे पालक बनल्यानंतर शाहरुख खान आणि गौरी खानने सरोगसीच्या माध्यमातून तिसरा मुलगा अबरामचं स्वागत केलं होतं. अबरामचा जन्म 2013 मध्ये झाला होता. अर्थातच अबराम लहान असल्याने त्याचे घरात सर्वांकडून लाड होतात. शाहरुखसुद्धा त्याचे सर्व लाड पुरवतो. परंतु एकदा अबरामने असं काही केलं, ज्यामुळे शाहरुखला वाटलं की तो कदाचित चांगला पिता नाही.
हा किस्सा खुद्द शाहरुखने त्याच्या ‘झिरो’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सांगितला होता. त्याने सांगितलं की एकदा तो अबरामजवळ जाऊन बसला आणि मुलाला बाजूलाच बसून राहण्याचा आग्रह केला. परंतु अबराम तिथून काही न बोलताच निघून गेला. त्यामुळे शाहरुखला खूप आश्चर्य वाटलं होतं. तेव्हा त्याला जाणीव झाली की, चित्रपटांच्या मागे पळता पळता मी माझ्या मुलांपासून तर दुरावलो नाही ना? याविषयी शाहरुख म्हणाला, “त्यावेळी माझ्या मनात विचार आला की कदाचित मी चांगला बाप नाही. माझा मुलगा माझ्यावर प्रेम करत नाही.”
कामामुळे कुटुंबीयांना आणि विशेषकरून मुलांना पुरेसा वेळ न दिल्याची खंत अनेक कलाकार व्यक्त करतात. याआधी अभिनेता आमिर खाननेही ही खंत बोलून दाखवली होती. इतकंच नव्हे तर त्याने अभिनयक्षेत्राला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मुलांनी समजावल्यानंतर त्याने तो निर्णय मागे घेतला. करिअरच्या मागे धावता-धावता मुलं आपल्यापासून दुरावल्याची भावना त्याच्या मनात होती.
शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत मुलगी सुहाना खानसुद्धा झळकणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.