मुस्लीम मुलाशी लग्न करणं का सोपं गेलं? मराठमोळी गायिका स्पष्टच बोलली, आईवडिलांनी मला..
प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुस्लीम पुरुषाशी लग्न करण्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आईवडिलांनी मला कधीच रोखलं नाही, असं तिने स्पष्ट केलं.

प्रसिद्ध मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे हिने 2021 मध्ये मुस्लीम बॉयफ्रेंड फरहान शेखशी लग्न केलं. या आंतरधर्मीय लग्नाबद्दल त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. एका मुलाखतीत शाल्मली तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. “बऱ्याच ट्रायल आणि एररनंतर मला रोमँटिकवालं करेक्ट प्रेम मिळालं आहे. मला माझ्या आईवडिलांचंही कौतुक वाटतं की, त्यांनी मला एक्स्प्लोअर करू दिलं,” असं ती म्हणाली. विशेष म्हणजे आंतरधर्मीय लग्नाला दोघांच्याही कुटुंबीयांकडून कसलाच विरोध नव्हता, असंही तिने स्पष्ट केलं.
अफेअर्सबद्दल कशी होती आईवडिलांची प्रतिक्रिया?
याविषयी शाल्मली म्हणाली, “बऱ्याच ट्रायल आणि एररनंतर मला रोमँटिकवालं करेक्ट प्रेम मिळालं आहे. मला माझ्या आईवडिलांचंही कौतुक वाटतं की, त्यांनी मला एक्स्प्लोअर करू दिलं. त्यांना माहिती होतं की हिचं काय.. ज्यांना आपण लफडे म्हणतो.. आई विचारायची की.. हा फ्रेंड आहे का तुझा? ती बॉयफ्रेंड म्हणायची नाही.. फ्रेंड म्हणायची. असा आमचा संवाद व्हायचा घरी. एकदा तर मला एक मुलगा पहिल्या डेटसाठी पिकअप करायला आला होता. तेव्हा आईने विचारलं की, काय डेट वगैरे काही आहे का? मी हो म्हटल्यावर तिचे हावभावच वेगळे होते.”
“तिला तेव्हाच कळलं होतं की, हीचं काय त्याच्यासोबत पटणार नाही. पण ती नको जाऊ वगैरे काही म्हणाली नाही. ब्रेकअप झाल्यावर तिने मला सांगितलं होतं की मला तुमच्या पहिल्या डेटच्या वेळीस सगळं समजलं होतं. कारण तुझ्यासाठी तो मुलगा खूप मऊ आहे. तरीसुद्धा तिने मला सगळं करू दिलं. आंतरधर्मीय लग्न करताना त्याच्या कुटुंबीयांना आणि माझ्या कुटुंबीयांना काही वेगळा विचार करावा लागला नाही. माझ्या आईवडिलांना एकच गोष्ट महत्त्वाची होती, ते म्हणजे .. माणूस कसा आहे?,” असं ती पुढे म्हणाली.
मुस्लीम कुटुंबात लग्न केल्यानंतर आयुष्य कसं बदललं, काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलला, याविषयीही शाल्मलीने सांगितलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मला असं वाटतं की आयुष्याच्या चार गोष्टी मी त्याच्या धर्मातून शिकले आणि तो चार गोष्टी माझ्या धर्मामुळे शिकला आहे. माझ्यापेक्षा जास्त तो गणेशोत्सव अधिक उत्साहाने साजरा करतो. तो सगळीकडे दर्शनासाठी जातो आणि मी घरी बसलेली असते.”