शूटिंगदरम्यान शहनाज गिलच्या घशात अडकली ‘नोज रिंग’; व्हिडीओ पाहून चाहतेही घाबरले
Shehnaaz Gill: अभिनेत्री शहनाज गिलने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शूटिंगदरम्यान तिच्या घशात नोज रिंग अडकली होती. तरीही तिने शूटिंग मध्येच थांबवली नाही. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘बिग बॉस’ या शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाज गिल आता एक सर्वांत लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे. सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग मोठ्या संख्येनं वाढला आहे. अभिनयक्षेत्रात ती सक्रिय असून नुकताच तिचा ‘इश्कनामा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून शहनाजच्या चाहत्यांनी तिच्याविषयी काळजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज तिच्या घशात काहीतरी अडकल्यामुळे जोरजोरात खोकताना आणि घशातून काहीतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी सहअभिनेता सौरभ सचदेवासुद्धा तिची मदत करतो. शूटिंगदरम्यान घडलेल्या या विचित्र प्रसंगाविषयी शहनाजने पुढे सांगितलं आहे.
‘इश्कनामा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शहनाजच्या घशात नोज रिंग अडकली होती. हाच व्हिडीओ शेअर करत तिने सांगितलं की, एका सीनच्या शूटिंगदरम्यान तिची नोज रिंग चुकून तिच्या घशात गेली. परंतु त्यानंतरही तिने शूटिंग थांबवलं नाही. शहनाजने तिचं शूट पूर्ण केलं. व्हिडीओमध्ये शहनाज खोकून तिच्या घशातून अडकलेली नोज रिंग काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिची बेचैनी पाहून सौरभसुद्धा तिची मदत करतो.
पहा व्हिडीओ-
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शहनाजने लिहिलं, ‘व्हिडीओच्या आधी.. छोटीशी बिहाइंड द सीन स्टोरी. तुमच्यापैकी अनेकांनी मला नथनीचा व्हिडीओ शेअर करायला सांगितलं होतं.’ तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. ‘शहनाज, कृपया स्वत:ची काळजी घे. कामाच्याही आधी स्वत:ला प्राधान्य दे’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘तू खूप खास आहेस, कृपया काळजी घे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे.
शहनाज गिलने ‘बिग बॉस 13’मध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतची तिची मैत्री विशेष चर्चेत होती. शोमधून बाहेर पडल्यानंतरही या दोघांमध्ये जवळीक पहायला मिळाली होती. मात्र सप्टेंबर 2021 मध्ये सिद्धार्थचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. आता सिद्धार्थच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर शहनाजचं नाव कोरिओग्राफर, डान्सर आणि अभिनेता राघव जुयालशी जोडलं जात आहे.