शिल्पा शिंदेनं तब्बल 11 वर्षांनंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितलं सत्य; सर्वांनाच बसला धक्का!

तब्बल 11 वर्षांनंतर शिल्पा शिंदे या वादावर पहिल्यांदा इतक्या मोकळेपणे व्यक्त झाली आहे. त्यावेळी जर मी माझी लढाई लढले नाही तर माझं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होईल, असं मला वाटलेलं, असं ती म्हणाली. त्यावेळी तिच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता, असंही तिने स्पष्ट केलं.

शिल्पा शिंदेनं तब्बल 11 वर्षांनंतर लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल सांगितलं सत्य; सर्वांनाच बसला धक्का!
Shilpa Shinde
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 02, 2026 | 9:50 AM

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदेनं तिच्या करिअरमधील सर्वांत मोठ्या वादाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. ही मालिका सोडल्याच्या बऱ्याच काळानंतर आता शिल्पाने म्हटलंय की तिने निर्मात्यांवर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप पूर्णपणे खरे नव्हते. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या ‘भारती टीव्ही’ या पॉडकास्टमध्ये शिल्पा शिंदे पहिल्यांदाच या वादावर मोकळेपणे व्यक्त झाली आहे. यावेळी बोलताना ती भावूक झाली होती.

ती म्हणाली, “भाभीजी घर पर हैं ही मालिका यशस्वी ठरूनही माझे आणि प्रॉडक्शन हाऊसचे वाद झाले होते. माझ्यावर एका विशिष्ट करारावर सही करण्यासाठी दबाव आणला गेला, ज्यामुळे मला इतरत्र कुठेही काम करता येत नव्हतं. जेव्हा मी त्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, तेव्हा मला धमक्या देण्यात आल्या आणि माझ्यावर दबाव आणण्यात आला. जर तू आमचं ऐकलं नाही, तर आम्ही तुम्हाला घरी पाठवून देऊ. तुला कुठेही काम मिळणार नाही.” यावेळी शिल्पाने दावा केला की तिला मालिकेतून काढून टाकण्याचं पूर्वनियोजनच करण्यात आलं होतं.

“मालिकेत काम करताना मला साधी सुट्टी पण मिळत नव्हती. अचानक मला सांगितलं गेलं की दुसऱ्या दिवशी शूटिंग नाही. माझ्या दहा दिवसांच्या एपिसोडचं शूटिंग फक्त दोन दिवसांत संपवण्यात आलं होतं. नंतर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापू लागल्या की मला मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यावेळी हे सर्व माझं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी केलं जात होतं. जसजसा वाद वाढत गेला, तसं मला कायदेशीर नोटीस मिळू लागल्या. नंतर हे प्रकरण इतकं वाढलं की मला स्वत:ला त्यात चहूबाजूंनी फसल्यासारखं वाटू लागलं होतं. जर मी मानसिकदृष्ट्या मजबूत नसते, तर कदाचित मी खचले असते. मला 12 कोटी, 20 कोटी रुपयांपर्यंत नोटीस पाठवू लागले होते. माझ्या वकिलांना तर त्यांनी खरेदी केलं होतं. इथे केस चालू होती आणि तो लंडनमध्ये जाऊन बसला होता”, असं शिल्पाने सांगितलं.

या मुलाखतीत पुढे शिल्पाने असं काही सांगितलं, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. “आज मी पहिल्यांदा हे स्वीकार करते की मी माझ्या निर्मात्यांविरोधात लैंगिक शोषणाचा खटला दाखल केला होता, पण ते खोटं होतं. कारण माझ्यासाठी दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. मी मालिका सोडली होती. तरीसुद्धा मला ते त्रास देत राहिले होते. प्रत्येक बाजूने दबाव वाढत होता. पोलिसांकडे तक्रार दाखल करताना मला सांगितलं गेलं की खटला दाखल करण्यासाठी गंभीर आरोप करावे लागतील”, असा खुलासा करताना शिल्पाला अश्रू अनावर झाले.

Follow Us