दीपिकाला कॅन्सर झाल्यानंतर सर्व नॉन-स्टिक भांडी काढून टाकली; कोटिंगमध्ये काय असतं? तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण माहिती

पत्नी दीपिकाला कॅन्सर झाल्यानंतर शोएब इब्राहिमने त्याच्या घरातून सर्व नॉन-स्टिक भांडी काढून टाकली होती. नुकत्याच एका व्लॉगमध्ये त्याने याबद्दलचा खुलासा केला आहे. नॉन-स्टिक भांडू वापरावेत की नाही, याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात, ते जाणून घ्या..

दीपिकाला कॅन्सर झाल्यानंतर सर्व नॉन-स्टिक भांडी काढून टाकली; कोटिंगमध्ये काय असतं? तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण माहिती
Shoaib Ibrahim and Dipika Kakar
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2026 | 11:30 AM

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या समस्यांचा सामना करतेय. दीपिकाला लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅन्सरवर मात केल्यानंतर तिच्या पोटात सिस्ट आढळले. दीपिका आणि तिचा पती, अभिनेता शोएब इब्राहिम हे युट्यूबवर व्लॉग पोस्ट करत त्यांच्या आयुष्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकत्याच एका व्लॉगमध्ये शोएबने त्याच्या किचनमधील फक्त एक पॅन सोडून सर्व नॉन-स्टिक भांडी काढून टाकल्याचं सांगितलं होतं. “मी घरातून सर्व नॉन-स्टिक भांडी काढून टाकली आहेत, फक्त एकच आहे, ज्यामध्ये ऑमलेट बनवलं जातं”, असं तो म्हणाला होता. नॉन-स्टिक पॅन्स किंवा भांडी वापरू नयेत, असं अनेकदा आपण ऐकतो. यामागचं नेमकं कारण काय आणि रोज ही भांडी वापरल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, याविषयी जाणून घेऊयात..

याविषयी हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्समधील वरिष्ठ सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हिपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. डी. चंद्रशेखर रेड्डी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काही गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. मॉडर्न किचन्समध्ये तेलाचा कमी वापर व्हावा आणि पदार्थ चिकटू नये म्हणून नॉन-स्टिक तवा किंवा इतर भांड्यांचा वापर सर्रास केला जातो. याविषयी डॉ. रेड्डी म्हणाले, “बहुतांश आधुनिक नॉन-स्टिक पॅन्स हे योग्य प्रकारे वापरल्यास दैनंदिन स्वयंपाकासाठी सुरक्षित मानले जातात. या पॅनमध्ये जे कोटिंग केलेलं असतं, ते प्रामुख्याने पॉलिटेट्राफ्लुरोइथिलीन (PTFE) यापासून बनलेलं असतं. हे कोटिंग स्वयंपाकाच्या सामान्य तापमानलाही सुरक्षित राहतं. त्यामुळे अंडी, भाज्या, पॅनकेक्स यांसारखे पदार्थ बनवण्यासाठी नॉन-स्टिक पॅनचा नियमित वापर केल्याने सर्वसामान्यपणे काही हानी होत नाही.”

“जेव्हा पॅन जास्त तापवलं जातं, खराब झालेलं असतं किंवा जुन्या रासायनिक सूत्रांनी बनवलेलं नॉन-स्टिक पॅन वापरत असाल तर त्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो. सुमारे 260 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात नॉन-स्टिक भांड्यावरील कोटिंग निघू शकतं आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे पॉलिमर फ्युम फिव्हर होऊ शकतो. हा तात्पुरता तापासारखा आजर असून त्यात डोकेदुखी आणि खोकला यांसारखी लक्षणं दिसतात. जास्त तापल्यामुळे अतिसूक्ष्म कण आणि वायूदेखील बाहेर पडू शकतात, ज्यामुळे श्वसनाला त्रास होऊ शकतो”, असंदेखील रेड्डी यांनी स्पष्ट केलं.

आधी नॉन-स्टिक भांड्यांमध्ये PFOA सारखे केमिकल्स वापरले जायचे, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता होती. परंतु आता बहुतांश मॉडर्न पॅन्समध्ये PFOA विरहित असतात, असंही त्यांनी सांगितलं. अनेकदा नॉन-स्टिक भांडी वर्षानुवर्षे तशीच वापरली जातात आणि त्यात त्याला स्क्रॅचेस आलेले असतात किंवा त्याचं कोटिंग निघालेलं असतं. यामुळे जेवणात सूक्ष्म कण जाण्याची शक्यता असते. अशी भांडी न वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

एकंदरीत जर योग्य प्रकारे नॉन-स्टिक भांडी हाताळणं गरजेचं आहे. अन्न कोणत्या तापमानावर शिजवलं जात आहे, याची काळजी घेतली पाहिजे आणि या भांड्यांची योग्य निगा राखली पाहिजे. त्याचप्रमाणे लोकांनी स्वयंपाकाच्या आरोग्यदायी पद्धती, संतुलित आहार, तेलाचा अतिरेकी वापर कमी करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवं, असा सल्ला डॉ. रेड्डी यांनी दिला आहे.

टीप- हा लेख सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहिती आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. कोणीतंही नवीन रुटीन सुरू करण्यापूर्वी नेहमीच आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Follow Us