श्रद्धा कपूरने आईवडिलांपासून वेगळं राहण्याचा घेतला निर्णय; घरासाठी भरलं तब्बल इतकं भाडं

अभिनेत्री श्रद्धा कपूरने अखेर वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील जुहू परिसरात तिने घर भाड्याने घेतलं आहे. यासाठी तिने लाखो रुपये मोजले आहेत. श्रद्धा तिच्या आईवडिलांसोबत राहत होती.

श्रद्धा कपूरने आईवडिलांपासून वेगळं राहण्याचा घेतला निर्णय; घरासाठी भरलं तब्बल इतकं भाडं
Shraddha Kapoor with father and mother
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 03, 2024 | 12:52 PM

शूटिंगचं व्यस्त शेड्युल, प्रायव्हसी या कारणांमुळे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी वेगळं घर घेऊन राहण्यास पसंती देतात. मात्र अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या आईवडिलांसोबत एकाच घरात राहत होती. आता ‘स्त्री 2’ या चित्रपटाच्या यशानंतर तिने मुंबईतील जुहू परिसरात भाड्याने घर घेतलंय. यासाठी तिने मोठी रक्कम मोजली आहे. जुहू परिसरातील एका टोलेजंग इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर तिने घर भाड्याने घेतलं असून ते जवळपास 3929 चौरस फूटांवर पसरलेलं आहे. या घराचं भाडं तब्बल सहा लाख रुपये प्रति महिना असल्याचं कळतंय. त्यासाठी श्रद्धाने आधीच 12 महिन्यांचा करार केला आहे. तिने 12 महिन्यांचं संपूर्ण भाडं म्हणजेच 72 लाख रुपयेसुद्धा एकदाच भरल्याचं समजतंय.

या घराच्या स्टँप ड्युटीसाठी श्रद्धाने अधिकचे 36 हजार रुपये भरले आहेत. 16 ऑक्टोबर रोजी तिने हा करार केला. या घरासोबतच श्रद्धाने टॉवरमध्ये चार कारच्या पार्किंगची जागा घेतली आहे. श्रद्धाला आलिशान गाड्यांची फार आवड आहे. तिच्या कलेक्शनमध्ये तब्बल चार कोटी रुपयांची लँबोर्गिनी हुरेकन टेकनिका ही गाडी आहे. श्रद्धा ही अभिनेता हृतिक रोशनचं जुहूमधील घर भाड्याने घेण्याचा विचार करत असल्याची आधी चर्चा होती. हा करार झाला असता तर श्रद्धा ही अभिनेता अक्षय कुमारची शेजारीण झाली असती. कारण त्याच इमारतीत अक्षय कुमार त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार स्वत:चं घर विकत घेण्यापेक्षा भाडेतत्त्वावर राहण्यास पसंती देतात. वांद्रे आणि जुहूसारख्या परिसरात अनेक आलिशान घरं आणि इमारती आहेत. या परिसरात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी राहतात. याआधी अभिनेता इमरान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लेख वॉशिंग्टन यांनी मुंबईत 9 लाख रुपये प्रति महिना भाड्याने घर घेतलं होतं. श्रद्धाने तिच्या चित्रपटांमधून, जाहिरातींमधून चांगली कमाई केली आहे. त्यामुळे आता तिने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रद्धा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक राहुल मोदीला ती डेट करत होती. ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याची श्रद्धा कपूरशी भेट झाली होती. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.