तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!

दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. यानंतर आता अभिनेता श्रेयस तळपदेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर श्रेयस तळपदेचा मोठा निर्णय; खाद्यपदार्थांमधील भेसळीचा घेतला धसका!
Tukaram Mundhe and Shreyas Talpade
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 15, 2026 | 1:34 PM

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला यांबरोबरच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येत असलेल्या कारवायांमुळे आता दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र अन्नपदार्थांमधील भेसळीचा विषय हा अनेकांसाठी चिंतेचा ठरला आहे. भेसळीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर आणि तुकाराम मुंढेंच्या कारवाईनंतर आता मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

“भेसळीबाबत सोशल मीडियावर जे व्हिडीओ पहायला मिळत आहेत, ते काही अंशी जुने किंवा बनवलेले असू शकतात. पण त्यातले 90 टक्के जरी आपण बाजूला केले तरी दहा टक्के व्हिडीओंमध्ये काहीतरी तथ्य असतंच. आता तुकाराम मुंढे यांनी जी धडक मोहीम हाती घेतली आहे, त्यातून भेसळीचं भीषण वास्तव पहायला मिळतंय. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही आमच्या घरातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा वापर खूप कमी केला आहे”, असं श्रेयसने सांगितलं.

याविषयी तो पुढे म्हणाला, “याआधी आमच्या घरी आठवड्यातून सात ते आठ वेळा पनीर किंवा दुधाचे पदार्थ खाल्ले जायचे. पण आता आम्ही आमच्या मुलीच्या आहारातूनही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी केले आहेत. मी दररोज रात्री झोपताना हळदीचं दूध प्यायचो, ते आता पूर्णपणे बंदच केलं आहे. चहातही आता दूध घेत नाही. एकतर कोरा चहा किंवा ब्लॅक कॉफी पिणं पसंत करतो. अगदीच पनीर खायची कधी इच्छा झाली तरी खात्रीशीर आणि विश्वासार्ह वाटत असलेल्या ठिकाणावरूनच पनीर आणलं जातं.”

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. वारंवार कारवाई करूनही या भेसळीला पूर्णपणे आळा घालण्यात प्रशासनाला यश येत नाही. मात्र आता तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून बनावट औषधं, गुटखा, पानमसाला आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. अवघ्या पंधरा दिवसांत त्यांनी 250 हून अधिक व्यक्तींवर कारवाई केली आहे.

Follow Us