Ankit Tiwari | अंकित तिवारीच्या कॉन्सर्टदरम्यान दोन तरुणींमध्ये जबरदस्त मारहारण; व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध गायक अंकित तिवारीचं बिहारमध्ये म्युझिक कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. मात्र या कॉन्सर्टदरम्यान श्रोत्यांमध्ये उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण झालं. हे भांडण नंतर मारहाणीपर्यंत पोहोचलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ankit Tiwari | अंकित तिवारीच्या कॉन्सर्टदरम्यान दोन तरुणींमध्ये जबरदस्त मारहारण; व्हिडीओ व्हायरल
अंकित तिवारी
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 03, 2023 | 9:13 PM

बिहार | 3 ऑक्टोबर 2023 : ‘आशिकी 2’मधील गाणी गायलेल्या अंकित तिवारीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याचं ‘तुम ही हो’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे. नुकताच अंकित तिवारीचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तो स्टेजवर गाणं गात होता आणि त्याच्या कॉन्सर्टमध्ये शेकडो चाहत्यांनी हजेरी लावली होती. मात्र याच कॉन्सर्टला गालबोट लागलं आहे. श्रोत्यांमध्ये उभ्या असलेल्या दोन तरुणी काही कारणावरून आपापसांत भिडल्या आणि त्या ठिकाणी जबरदस्त हंगामा झाला. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन तरुणी एकमेकांचे केस ओढताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. खुद्द अंकितसुद्धा हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला होता.

अंकितचं लाइव्ह कॉन्सर्ट बिहारमधील कटिहारमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. अंकित जेव्हा स्टेजवर गाणं गात होता त्याचवेळी दोन तरुणींमध्ये भांडण सुरू झालं. हे भांडण हळूहळू मारहाणीपर्यंत पोहोचलं. त्या दोघींचं भांडण मिटवण्यासाठी काही जणांनी पुढाकार घेतला. मात्र त्यात त्यांनाच दुखापत झाली. चाहत्यांचं हे वागणं पाहून अंकितने त्याचा परफॉर्मन्स मध्येच थांबवला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

या व्हिडिओमध्ये दोन तरुणी एकमेकींना मारताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर त्या एकमेकांचे केसही ओढत आहेत. या दोघींचं भांडण मिटवण्यासाठी काहीजण पुढाकार घेतात. मात्र या दरम्यान त्यांनाही मार लागतो. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मात्र या संपूर्ण घटनेवर अद्याप अंकितकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. बिहारमध्ये एखाद्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये झालेल्या वादाची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक भोजपुरी गायकांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये असेच वाद निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी अक्षरा सिंहलाही मध्येच तिचा शो बंद करावा लागला होता. तिच्या कार्यक्रमातही तोडफोड झाली होती.