
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये सीता चरितमचा प्रीमियर पार पडला. प्रेक्षकांनी ‘सीता’ने कथन केलेल्या रामायणातील थरारक आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या कथेचा अनुभव घेतला. यात तब्बल 513 कलाकारांनी सहभाग घेतला होता. या प्रीमियरनंतर प्रेक्षकांनी उभे राहून 5 मिनिटे टाळ्या वाजवल्या. नृत्यांगना श्रीविद्या वर्चस्वी यांनी सीता चरितमचे दिग्दर्शन केले आहे.
या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेसी म्हणाला की, ‘मला इथे आल्याचा मला आनंद आहे. श्रीविद्याजींनी दिग्दर्शक म्हणून उत्तम काम केले आहे.’ लोकप्रिय अभिनेत्री हिना खान म्हणाली की ‘आम्हाला शो खूप आवडला. संपूर्ण कार्यक्रमात माझे अंगावर काटा आला. श्रीविद्या सीतेच्या व्यक्तिमत्त्वासारखी दिसत होती. सर्वच कलाकारांनी चांगले काम केले.
मुंबईतील या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, गायिका अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ अभिनेते पंकज बेरी आणि दलिप ताहिल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच धारावी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग फ्री स्कूलमधील 50 हून अधिक मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता, त्यामुळे हा कार्यक्रम आणखी खास बनला. प्रेक्षकांमधील अनेकांसाठी आणि मुलांसाठी अशी कथा जिवंत पाहणे हा वेगळा अनुभव होता.
कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली – अनुराधा पौडवाल
सीता चरितम या कार्यक्रमाबद्दल अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, ‘हा आमच्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. यासाठी खूप मेहनत घेण्यात आली. आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचा आणि मुलांना धर्मात रस निर्माण करण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. संपूर्ण अनुभव खूप सुंदर होता.’
रामायणाच्या 20 हून अधिक आवृत्त्यांचा अभ्यास करुन आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनात ही पटकथा तयार करण्यात आली आहे. हा शो शास्त्रीय नृत्य, लोककला, कठपुतळी, मूळ संगीत आणि डिजिटल युगाचे मिश्रण करून सीतेच्या जीवनातील प्रेम,त्याग, ज्ञान आणि भक्तीचे प्रदर्शन करतो.
मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला – श्रीविद्या
या कार्यक्रमानंतर बोलताना श्रीविद्या म्हणाली, ‘मुंबईकरांनी दिलेला प्रतिसाद अद्भुत आहे. कलात्मक प्रामाणिकपणाने सांगितलेल्या सीता चरितम सारख्या कथा लोकांच्या हृदयात स्थान मिळवतील. माझ्यासाठी, सीतेचे जीवन, तिच्या आयुष्यातील क्षण, तिने उचललेली पावले हे माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे. ही कथा आजच्या प्रेक्षकांसाठी सोपी करुन सांगणे खूप समाधानकारक आहे.’
या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, तसेच जमलेल्या पैशांतून या शोने 1327 आर्ट ऑफ लिव्हिंग मोफत शाळांमधील 1 लाखाहून अधिक ग्रामीण आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा कार्यक्रम भारतातील इतर शहरे आणि परदेशातही सादर करण्यात येणार आहे.