मुलीच्या नावावरून अभिनेत्रीला घाणेरडे मेसेज; वैतागून म्हणाली ‘मला अनफॉलो करा’

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती खन्नाला तिच्या मुलीच्या नावावरून ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगला वैतागून अखेर तिने एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तिने टीकाकारांना चांगलंच सुनावलं आहे.

मुलीच्या नावावरून अभिनेत्रीला घाणेरडे मेसेज; वैतागून म्हणाली मला अनफॉलो करा
Smriti Khanna with her daughter
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 20, 2024 | 2:00 PM

‘मेरी आशिकी तुम से ही’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्मृती खन्नाने 5 सप्टेंबर 2024 रोजी दुसऱ्या मुलीला जन्म दिला. स्मृती आणि तिचा पती गौतम गुप्ता यांनी त्यांच्या या मुलीचं नाव ‘ऐझाह’ (Aizah) असं ठेवलं. मात्र याच नावावरून तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नुकत्याच एका व्लॉगमध्ये स्मृती या ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. स्मृती आणि गौतम हिंदू आहेत, तरी त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव मुस्लीम का ठेवलं, असा सवाल ट्रोलर्सनी केला. त्यावर स्मृतीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

स्मृती म्हणाली, “हा व्लॉग विशेषकरून माझ्या मुलीच्या नावाबद्दल आहे. लोक मला भयंकर आणि घाणेरडे मेसेज पाठवत आहेत. माझ्या मुलीच्या नावात ‘Z’ असल्याने ते मुस्लीम नाव असल्याचा अंदाज ते लावत आहेत. काही लोकांचं हे वागणं खरंच खूप धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. मला तर इतकंही माहित नाही की या नावाशी कोणत्या धर्माचा काय संबंध आहे? मी माझ्या मुलीचं नाव ऐझाह यासाठी ठेवलं कारण मला ते आवडलं आणि माझी मोठी मुलगी अनायकाने ते नाव निवडलंय. त्यामुळे माझ्यासाठी ते खूपच खास आहे. माझ्यासाठी हेच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला दुसऱ्यांच्या बाळाच्या नावाबद्दल काही समस्या असेल तर तुम्हाला खरंच मदतीची गरज आहे. ही काही वागण्याची पद्धत नाही. आम्हाला ऐझाह हे नाव खूप आवडलंय आणि तेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला एवढी समस्या असेल तर मला अनफॉलो करू शकता.”

स्मृची खन्ना आणि गौतम गुप्ता यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये लग्न केलं. स्मृतीने एप्रिल 2020 मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी अनायका असं ठेवलंय. स्मृतीने ‘ये है आशिकी’, ‘बालिका वधू’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ 3’, ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us